नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदुषण रोखण्यासाठी ग्रामीण भागात नदीकाठावरील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. ग्रामीण भागातील गोदावरी नदीपात्रामधील पानवेलींविषयीही आढावा घेण्यात आला. गोदावरी नदी प्रदुषण संदर्भात जिल्हा परिषदस्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, निफाडचे गटविकास अधिकारी टी. बी. जाधव, नाशिकचे सहायक गटविकास अधिकारी रघुनाथ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी विविध कामांचा आढावा घेताना गोदावरी नदी प्रदुषण थांबविण्यासाठी आणि शुध्दीकरणासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. ग्रामीण भागातील नदीकाठावरील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण असून उर्वरित ग्रामपंचायतींनी सांडपाणी व्यवस्थापनाबाबतच्या उपाययोजना तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. पंडित यांनी नमामि गोदा अंतर्गत केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्राधान्याने उपयोग करण्याची सूचना केली. नदीपात्रातील पानवेलींचा मुळापासून नाश करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी विविध घटकांचा आढावा घेताना प्रत्येक ग्रामपंचायतीने यापुढे स्वच्छताशुल्क आकारण्याचे व स्वच्छतेच्या कामासंबंधी बचत गटांना सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले. बैठकीस ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे, विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे, चांदोरीचे सरपंच विनायक खरात, सायखेड्याचे सरपंच संदीप कातकाडे, ओढ्याचे सरपंच प्रिया पेखळे यांच्यासह संसरी, लाखलगाव, गोवर्धन, महादेवपूर, चांदोरीचे ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा कक्षातील सल्लागार उपस्थित होते.