शहरातील वाहन विक्रेत्यांमध्ये खळबळ
‘सफारी स्ट्रोक’ ही तेरा लाखांची मोटार खरेदी करण्यासाठी एक ग्राहक दालनात आला. मोटारीची काही तांत्रिक माहिती घेतली. नंतर मोटार स्वत: चालवून पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. बडी असामी दिसत असल्याने चकचकीत मोटार त्याला कर्मचाऱ्यासमवेत चालविण्यासाठी देण्यात आली. चाचणी घेण्यासाठी ही मोटार घेऊन तो महामार्गावर गेला. रस्त्यातच कर्मचाऱ्याला धमकावत त्या बनावट ग्राहकाने खाली उतरवून दिले आणि मोटार घेऊन पसार झाला. सोमवारी सायंकाळी अतिशय वर्दळीच्या द्वारका भागात घडलेल्या या घटनेमुळे वाहन विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहर परिसरात फसवणूक व चोरीच्या वेगवेगळ्या घटनांचे सत्र सुरू आहे. त्यात या घटनेने नव्याने भर घातली. वाहनांची विक्री करणाऱ्या दालनांमार्फत ग्राहकांना गाडीची रपेट मारण्याची व्यवस्था केली जाते. महागडी मोटार खरेदी करताना ती प्रत्यक्षात चालते तरी कशी याची अनुभूती घेण्यासाठी केलेली व्यवस्था विक्रेत्याला अडचणीत आणणारी ठरल्याचे या प्रकाराने अधोरेखित केले. द्वारका परिसरातील कांचन मोटार या ठिकाणी हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास संशयित दालनात आला. त्याने सफारी स्ट्रोक या गाडीची माहिती घेऊन ती चालविण्याची इच्छा प्रदर्शित केली. लगेचच ती व्यवस्था केली गेली. यावेळी कर्मचारी मोटारीत होता. संशयिताने मोटार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर नेली. द्वारका चौकालगत पुलावरून उतरण्यासाठी रस्ता आहे. संशयिताने मोटारीतील कर्मचाऱ्याला तिक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत शिवीगाळ केली. अचानक झालेल्या प्रकाराने आणि पुलावर भरधाव जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने दिवसाढवळ्या ही घटना घडत असूनही ती लक्षात आली नाही. संशयिताने कर्मचाऱ्याला खाली उतरवून देत मोटार घेऊन पळ काढला. धास्तावलेल्या कर्मचाऱ्याने लगेच दालनातील सहकारी आणि पोलिसांशी संपर्क साधला.
नवी मोटार या पद्धतीने पळविली जाईल, याची साशंकता कोणाला नव्हती. संशयिताने जी मोटार लंपास केली, ती प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेली नव्हती. या घटनेमुळे वाहन विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.