लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी शहरातील वास्तूविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्याचे रेल्वे विभागाने निश्चित केले आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच नाशिक दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागाची रचना करण्यासाठी स्थानिक वास्तूविशारद महाविद्यालयांशी संपर्क साधण्याची सूचना केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविक सहभागी होतात. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली होती. यावेळी त्या अनुषंगाने नियोजन करण्याची तयारी केली जात आहे. रेल्वेमंत्र्यांनी बैठकीत नाशिकरोड रेल्वे स्थानक इमारतीच्या पुनर्विकास करण्याची आवश्यकता मांडली. दर्शनी भागाची व इमारतीची रचना करताना स्थानिक संस्कृती व परंपरा यांचे प्रतिबिंब उमटणे महत्वाचे आहे. स्थानिक वास्तूविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने हे साध्य करता येईल. त्यामुळे स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लवकरच महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे नियोजन रेल्वे अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

आणखी वाचा-नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सानुग्रह अनुदान; प्रशासकीय राजवटीत दिवाळी गोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी दीर्घकालीन मोठी तरतूदीचा आराखडा तयार केलेला आहे. नाशिक-पुणे द्रुतगती रेल्वेमार्ग आणि महापालिकेच्या मेट्रो निओला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे नियोजन होईल, असे अधिकारी सांगतात. नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. कुंभमेळ्याच्याच्या पार्श्वभूमीवर, सद्यस्थितीत रेल्वेने स्थानक व्यवस्थापक, व्यावसायिक, पार्सल कार्यालय, आरपीएफ, तिकीट तपासनीस कर्मचारी आदी कार्यालय सामावणाऱ्या स्थानक इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२७ च्या कुंभमेळ्याआधी हे काम पुर्णत्वास नेण्याचे नियोजन केले जात आहे.