लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : कारवाईत पकडलेले लाकूड आणि मालवाहू वाहन दंडात्मक कारवाई करून मालासह सोडून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सहायक वनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे आणि वनपाल सुरेश चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदार हा साक्षीदाराच्या शेतातील जांभूळ आणि सादडाच्या जुन्या वाळलेल्या झाडाचे लाकूड मालवाहू वाहनातून घेऊन इगतपुरीजवळील गोंदे येथील पेपर मीलमध्ये विक्रीसाठी निघाला होता. सहायक वनसंरक्षक तथा उपवनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे (५४), वनपाल सुरेश चौधरी आणि कावेरी पाटील यांनी ही गाडी पकडली होती. ३१ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर वाहन मालासह म्हसरूळ येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले गेले. तक्रारदार व साक्षीदाराने वाहन सोडण्याची विनंती केली. तेव्हा सहायक वनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे यांनी वनपाल सुरेश चौधरी याच्यामार्फत दोन हजार रुपये दंड आणि १० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने ही रक्कम वनपाल चौधरी याच्याकडे दिली. पंचासमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारून सहायक वनसंरक्षक निरभवणे यांच्याशी संपर्क साधून आपल्याकडे ही रक्कम मिळाल्याचे कळविले. त्यास निरभवणे यांनी होकार देत त्यांना गाडीचे आदेश घेण्यासाठी पाठवून देण्याची भ्रमणध्वनीवर सूचना केली.

या प्रकरणी सहायक वनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे आणि वनपाल सुरेश चौधरी यांच्याविरुद्ध वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी लाचखोरीत सापडल्याने वन विभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी काम पाहिले. सापळा पथकात हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक योगेश साळवे व विनोद पवार यांचा समावेश होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

कोणताही शासकीय अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणताही खासगी व्यक्ती कुठलेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा न करण्यासाठी किंवा ते काम करून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी १०६४ या टोल फ्री किंवा ०२५३-२५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader