नाशिक: उन्हाळी कांद्याला भाव वाढेल, या आशेने चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यावर वाखारी येथे कोणीतरी युरिया टाकून नुकसान केले आहे.
वाखारी येथील शेतकरी दिनेश चव्हाण यांच्या शेतातील राहत्या घरासमोरील कांदा चाळीत हा प्रकार करण्यात आला. युरियामुळे २०० ते २५० क्विंटल उन्हाळी कांदा खराब झाला आहे. बुधवारी चव्हाण हे चाळीकडे गेल्यावर त्यांना चाळीतील कांद्यावर युरिया टाकलेला दिसला. हा प्रकार चव्हाण यांनी नातेवाईकांना सांगितला. या प्रकाराची पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून चव्हाण यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा… नाशिक: गिते स्क्वेअर इमारतीला आग; लाखो रुपयांचे नुकसान
दरम्यान, चव्हाण यांच्या दुसऱ्या ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या चाळीत देखील युरिया टाकण्यात आला आहे. सध्या बाजारात आवक कमी असल्याने कांद्याचे भाव बऱ्यापैकी वाढले असून , त्यात अशा प्रकारच्या खोडसाळ वृत्तीने कांदा खराब झाल्याने चव्हाण यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.