राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि नाशिकमधील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ प्राची पवार यांच्यावर मंगळवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. एका अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्राची पवार गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राची पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत पवार यांच्या कन्या आहेत.
नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन शिवारात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी प्राची पवार गोवर्धन शिवारातील आपल्या फार्म हाऊसमध्ये गेल्या होत्या. दरम्यान, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
प्राची पवार यांच्यावरील हल्ल्यानंतर नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला झाला, हे अद्याप समजू शकलं नाही. या हल्ल्यानंतर पवार यांना तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.