जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर १५० ते २०० जणांच्या जमावाने हल्ला करत मोटारीच्या काचा फोडल्याची तसेच पैसे हिसकावून घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास पथराड (ता.धरणगाव) येथून पाळधी गावाकडे मोटारीतून येत होते. त्याचवेळी रेल्वे फाटकाजवळ १५० ते २०० जणांचा जमाव त्यांच्या मोटारीवर लाठ्या काठ्या घेऊन चालून आला. जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करत त्यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. पाटील यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले. त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून मोटार पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला. अशाच प्रकारे राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, प्रा.एन.डी.पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. सदरचे हल्ले महायुतीच्या नेत्याने सांगितल्यावरून करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मालेगावात दोन ठिकाणी मतदार यंत्रात दोष

हेही वाचा – बाहेरून मतदार आणल्याने कांदे-भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की , सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी

मंगळवारी रात्री उशिरा धरणगाव पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शिवसेनेचे उपनेते संजय सावंत, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी आदींनी भेट देऊन पोलिसांशी चर्चा केली.