त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धूप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदूधर्मीयांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुरोहित संघाने संशयितांवर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचेसुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ या वर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल. गेल्या वर्षी एका विशिष्ट जमावाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता.