करोना काळात चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भाडेतत्त्वावर लावण्यात आलेल्या रुग्णवाहिकेची थकीत रक्कम राज्य शासनाकडून अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे चाळीसगाव येथील तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शुक्रवारी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला.
हेही वाचा- नाशिक : मातोश्री वारीत दोन नगरसेवकांच्या अनुपस्थितीने संभ्रम ; भाजपच्या पूनम धनगर शिवसेनेत
धीरज कासोदे (रा. वृंदावननगर, चाळीसगाव) असे आत्मदहन करणार्या तरुणाचे नाव आहे. धीरज यांच्याकडे खासगी रुग्णवाहिका आहेत. त्यावरच धीरज यांचा उदरनिर्वाह होतो. करोनाच्या काळात चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयातर्फे धीरज यांच्या तीन रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर लावण्यात आल्या होत्या. या तिन्ही रुग्णवाहिकांनी दिलेल्या मुदतीत आपली सेवा बजावली होती. या कालावधीत तिन्ही रुग्णवाहिकांचे सुमारे १५ लाख, ५१ हजार, ४०० रुपये राज्य शासनाकडे थकीत असून, ती त्वरित रक्कम मिळावी, यासाठी धीरज यांनी वारंवार मागणी केली. मात्र, त्यांच्या मागणीची चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाने कुठलीही दखल घेतली नाही.
हेही वाचा- दुर्मिळ कासवांची अवैध विक्री; वनविभागाकडून विक्रेत्याला अटक
कर्जाचे हफ्ते थकले
धीरज यांनी कर्ज काढून रुग्णवाहिका घेतल्या आहेत. मात्र, त्यांचे कर्जाचे हप्तेही थकले आहेत. तरुणाने केलेल्या मागणीची कुठलीही दखल न घेतल्याने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी उमेश पाटील, सोनार आदींनी तातडीने धाव घेत तरुणांजवळ असलेली पेट्रोलची बाटली आणि आगपेटी जप्त केली. ही माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सागर पाटील दिली.