नाशिक – नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेखाली १७ ते १९ मार्च या कालावधीत ठक्कर डोम येथे ‘ऑटो ॲण्ड लॉजिस्टिक (स्वयंचलित दळणवळण) एक्स्पो’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये या दोन्ही क्षेत्रातील सर्व घटक एका छताखाली येणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून चालकांसाठी विश्रांतीगृह, आरोग्य तपासणीसह प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेचे चे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा >>> नाशिक : औद्योगिक गुंतवणूक परिषदेत उद्योगांपुढील अडचणींवर चर्चा
यावेळी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पी. एम. सैनी, उपाध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत, सचिव शंकर धनावडे, सल्लागार जे. पी. जाधव आदी उपस्थित होते. उद्घाटनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. फड यांनी संघटनेकडून शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. वाहतूक क्षेत्रातील महत्वाचा घटक असलेल्या चालकांसाठी विश्रांतीगृह, आरोग्य तपासणी, प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनात सायकलपासून ते ट्रेलरपर्यंत सर्व वाहनांचा समावेश असणार आहे. विविध नामांकित कंपन्या व संस्थांचे दालन राहणार आहेत.