लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : रात्री व्दारका परिसरात सिटीलिंक बसला रिक्षा अडवून प्रवासी महिलेचा विनयभंग आणि सिटीलिंक बस चालक, वाहक यांना मारहाण, दगड फेकून बसची काच फोडणाऱ्या दोन जणांविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांनी संशयित रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बेशिस्त रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे नाशिकची बदनामी होत आहे. नाशिकच्या रिक्षाचालकांची गैरवर्तणूक माहीत असणारे रात्री रिक्षातून प्रवास करणे टाळतात. प्रवाशांशी किरकोळ कारणावरुन वाद घालणे, नियमांचे पालन न करता रिक्षा दामटून पोलिसांना आव्हान देणे, असे प्रकार शहरात कायमच होतात.
गुरूवारी एक महिला रात्री १० वाजेच्या सुमारास नाशिकरोडवरील बोधलेनगर येथील बस थांब्यावर उभी असताना त्याठिकाणी एक रिक्षा आली. चालक आणि त्याच्याबरोबर असलेल्या एकाने महिलेस वारंवार कुठे जायचे आहे, अशी विचारणा करुन अश्लिल हावभाव केले. महिलेने दुर्लक्ष केले. सिटीलिंक बस आली असता महिला त्या बसमध्ये चढली. त्यानंतर संशयितांनी तिचा रिक्षातून पाठलाग केला. महिलेने ही बाब बस चालकाच्या निदर्शनास आणून दिली. द्वारका भागात बस थांबवून चालकाने जाब विचारला असता संशयितांनी चालक आणि वाहकास शिवीगाळ आणि मारहाण केली. महिलेसमोर नग्न होत बसवर दगडफेक केली. त्यामुळे बसची काच फुटल्याने नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. भद्रकाली आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली. शहरातील वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या कार्यशैलीविरोधात ओरड होऊ लागल्याने मुंबई नाका पोलिसांनी त्वरेने तपास करुन संशयित रिक्षाचालक मिझान रज्जा उर्फ शेख (२०, रा. भद्रकाली) याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मिझान हा सराईत गुन्हेगार असून ऑगस्टमध्ये दोन गटात झालेल्या वादात तो आरोपी होता. याशिवाय त्याच्यावर चोरीचा गुन्हा आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांविरुध्द पुन्हा कारवाई
शहरात पोलिसांच्या वतीने बेशिस्त रिक्षाचालकांविरूध्द पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस ठाणेनिहाय बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी याआधीही रिक्षा थांबे, रिक्षाचालकांचे वर्तन याबाबत पोलीस आयुक्तांना सुचना केल्या होत्या.