लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: एखाद्या इमारतीत खुल्या व दर्शनी भागात असलेल्या वीज मीटरला वाचन उपलब्ध नसल्याचे शेरे, तर काही ग्राहकांची अस्पष्ट छायाचित्रामुळे अकस्मात वाढलेली देयके. मीटरवरील वीज वापर नोंदणीतील निष्काळजीपणाची किंमत ग्राहकांना मोजावी लागत असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात वीज ग्राहक समितीकडे वेगवेगळ्या भागातून वारंवार या तक्रारी प्राप्त होतात. वीज वापराचे छायाचित्र काढून अर्थात वाचन करून देयके देणे महावितरणला बंधनकारक आहे. सरासरीच्या आधारे कमी वा अधिक वीज देयक दिली तरी दोन्ही गोष्टींचा ग्राहकांना मनस्ताप व फटका सहन करावा लागतो, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. तथापि, हे आक्षेप महावितरणला मान्य नाही.
नाशिक मंडळा अंतर्गत चांदवड विभागातील एक लाख ६२ हजार ९१७, नाशिक ग्रामीण विभागातील दोन लाख ४३ हजार ३३४, नाशिक शहर एक विभागात दोन लाख १८ हजार ४०६ आणि नाशिक शहर दोन विभागात साडेचार लाखहून अधिक ग्राहक आहेत. ग्राहकांना दरमहा त्यांनी वापरलेल्या विजेचे देयक मीटर वाचन करून अचूक, योग्य व वेळेत देण्यासाठी मीटर वाचन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधितांना महावितरणच्या वरिष्ठांनी मध्यंतरी मीटर वाचन करताना छायाचित्रांचा दर्जा सुधारून आणखी अचूक काम करण्याची सूचना केली होती.
हेही वाचा… जळगाव: जलतरण तलावात तरुणाच्या मृत्यूची तहसीलदारांकडून चौकशी
गंगापूर रस्त्यावरील एका सोसायटीत प्रवेशाच्या जागी दर्शनी भागात सर्व सदनिकाधारकांचे एकत्रित वीज मीटर आहेत. मात्र या इमारतीतील सदस्यांना काही महिन्यांपासून सरासरी देयके प्राप्त होतात. देयकांवर चालू रिडिंग उपलब्ध नसल्याचा शेरा अनेक महिन्यांपासून दिसत आहे. बंदीस्त ठिकाणी वा छायाचित्र काढणे शक्य नसल्यास एखाद्या महिन्यात वीज वापराची माहिती न मिळणे समजू शकते. मात्र खुल्या व दर्शनी भागातील वीज मीटरच्या नोंदी न घेण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. अन्य एका इमारतीतील ग्राहकांना अस्पष्ट छायाचित्रांद्वारे वाढीव देयके प्राप्त झाली. त्यातील काहींनी देयकांवरील नोंदी व प्रत्यक्षातील नोंदी यांची पडताळणी केली असता त्यामध्ये मोठी तफावत आढळली. संबंधितांना आता वीज कंपनीच्या कार्यालयात देयके कमी करण्यासाठी खेटा माराव्या लागत आहेत.
सरासरीनुसार प्राप्त होणारे देयक कमी असेल वा जास्त असले तरी ग्राहकाला त्रास होतो. कारण देयक कमी आले तर नंतर मीटर नोंदीनुसार कंपनी एकत्रित देयके पाठवते. सरासरी देयक जास्त असल्यास त्याचा नाहक भार ग्राहकाला सहन करावा लागतो. मुळात कायद्यानुसार मीटर नोंदीनुसार ग्राहकाला देयक देणे महावितरणला बंधनकारक आहे. काही कारणास्तव एखाद्या महिन्यात मीटर नोंद मिळू शकली नाही तर पुढील महिन्यात ती घ्यायला हवी. ही नोंद घेण्याकरिता विशिष्ट तारखेला येणार असल्याची ग्राहकांना पूर्वसूचनाही देता येईल. मात्र तसे काहीही न करता सरासरी वीज देयके देणे अयोग्य आहे. – ॲड. सिध्दार्थ वर्मा (सोनी) (सचिव, वीज ग्राहक समिती)
नाशिक परिमंडळाचा विचार केल्यास सरासरी वीज देयकांचे प्रमाण केवळ ३.९ टक्के इतके आहे. घराला कुलूप, वीज मीटर नोंद घेता न येणे अशी काही कारणे असल्यास संबंधित ग्राहकास सरासरी देयक दिले जाते. वीज मीटर नोंदी प्रक्रियेवर मुख्यालयासह स्थानिक पातळीवर देखरेख ठेवून साप्ताहिक आढावा घेतला जातो. मीटर नोंदींच्या छायाचित्रांबाबत नमुना पडताळणी केली जाते. अस्पष्ट छायाचित्र असल्यास ते रद्द केले जाते. शहर व ग्रामीणमध्ये अस्पष्ट छायाचित्रे रद्दबातल ठरण्याचे प्रमाण १.९ टक्के आहे. एखाद्या ग्राहकाबाबत सरासरी वा अस्पष्ट छायाचित्रावरून देयक दिले गेले असेल तर त्याची चौकशी केली जाईल. – ज्ञानदेव पडळकर (अधीक्षक अभियंता, नाशिक मंडळ, महावितरण)