नाशिक – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीत असलेल्या बेबनावाचे दर्शन पुन्हा झाले असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशी विधाने करू नयेत, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना सुनावले.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराविषयी मित्रपक्ष गंभीर नसल्याचे दिसत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार नाशिक गाठावे लागत आहे. महायुतीच्या प्रचारापासून सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार माणिक कोकाटे अंतर राखून आहेत. छगन भुजबळही महायुतीच्या प्रारंभीच्या बैठकांना उपस्थित नव्हते. बुधवारी पिंपळगाव येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कोकाटे, भुजबळ दोघेही व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा – नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवेळी ठाकरे गटाची घोषणाबाजी
हेही वाचा – नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या २४ मेपासून परीक्षा
या पार्श्वभूमीवर, नाशिक येथे आलेले तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिल्ली दरबारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाल्याचे विधान केले होते. त्यासंदर्भात तटकरे यांनी, गोडसेंना काही गोष्टी माहिती नसल्याने संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य त्यांनी टाळण्याचा सल्ला दिला. आमदार सुहास कांदे यांनी अजित पवार गटाबद्दल बोलू नये. मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघाविषयी मर्यादित ठेवावे, असे तटकरे यांनी सांगितले. तब्येत ठीक नसल्याने अजित पवार प्रचारात सामील झाले नाहीत. संभ्रम निर्माण करणे विरोधकांचे काम आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी हा प्रयत्न केला. आम्ही अधिक मजबूत राहू. महायुती म्हणून विधानसभेलाही एकत्र राहू, असे त्यांनी नमूद केले.