लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी देवीच्या गडावरील सुधारित विकास आराखड्याच्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. गडाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुढील काही दिवसात प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी वितरीत होऊन प्रत्यक्षात कामांना सुरूवात होईल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांच्या आग्रही भूमिकेमुळे सप्तश्रृंग गडाच्या विकासाविषयी लवकरच निर्णय होणार आहे. सप्तशृंग गड तीर्थक्षेत्र स्थळाला मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा शासनास सादर केला होता. उच्चाधिकार समितीने दिलेल्या सूचनांप्रमाणे मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा अंदाजपत्रकांसह १२ जुलै रोजी ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आला आहे. यासाठी पालकमंत्री भुसे यांनी वेळोवेळी बैठका घेत गडाच्या विकासासंदर्भात पाठपुरावा केला आहे.
आणखी वाचा-नोकरी महोत्सवाच्या आडून राजकीय डावपेच? राष्ट्रवादीच्या उपक्रमात तीन हजार युवकांचा सहभाग
सप्तश्रृंगी देवी हे साडेतीन शक्ती पिठापैकी अर्धपीठ असून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे सुधारित आराखडयात नमूद केलेल्या मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत आवश्यक आहे. सुधारित आराखड्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करण्याची मागणी मंत्री भुसे यांनी पत्राद्वारे केली आहे. कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी देवी, सप्तश्रृंग गड क्षेत्रास ग्रामविकास विभागाने ब वर्ग दर्जा दिला आहे. येथील यात्रोत्सवात २५ ते ३० लाख भाविक, पर्यटक येतात. त्यांना सुविधा पुरविण्यासाठी २३.०२ कोटींचा आराखडा सादर करण्यात आला होता. उच्चाधिकार समितीच्या सूचनेनुसार मूळ आराखड्यात काही बदल करून २०.२५ कोटींचा सुधारीत आराखडा शासनास सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, आराखड्यात प्रस्तावित काही कामे अन्य योजनांमधून सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे ही कामे वगळून तसेच, भाविकांच्या गरजा, मागणीनुसार काही नव्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. शासनास पहिल्या टप्प्यात सादर करावयाची अंदाजपत्रके संबंधित यंत्रणांकडून तयार करुन घेण्यात आली आहेत. सुधारित विकास आराखड्याला कधी मंजुरी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.