नाशिक – नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेवून आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. जातीपातीचे, धार्मिक राजकारण करायचे नाही हा आमचा शिरस्ता आहे. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
देवळाली मतदारसंघातील सय्यद प्रिंपी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मंगळवारी आचारसंहिता लागू होण्याआधी झाले. यानिमित्त आयोजित सभेत पवार यांनी विविध जणांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा उल्लेख केला. निवेदनांमधील काही प्रश्न केंद्र तसेच राज्य सरकारशी संबंधित आहेत. द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असून निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा – नाशिकरोडमध्ये वाहनातून अमली पदार्थाचा साठा जप्त – दोघांसह महिलेविरुध्द गुन्हा
देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण, शहरी आणि छावणी मंडळ अशा तीन भागात विभागलेला आहे. या तीनही भागातील रस्ते, आरोग्य सेवा व आवश्यक विकास कामांसाठी अडीच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाशिकरोड येथे दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. एक हजार ५०० कोटी रुपयांच्या नदीजोड प्रकल्पासही मान्यता मिळाली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळणार असल्याचे नमूद करुन वारकऱ्यांसाठी ठोस उपक्रम हाती घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी काही प्रश्न मांडले. सध्या शहरात विजेचा प्रश्न भेडसावत आहे. शेतकऱ्यांची वीज देयके माफ झाली असली तरी दोन महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे पीक धोक्यात आले आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे प्रश्न सोडविण्याची मागणी आमदार अहिरे यांनी केली.