नाशिक : माजीमंत्री बबन घोलप हे सध्या आपण खूप निष्ठावान असल्याचे दाखवत आहेत. मात्र १९९१ मध्ये जेव्हा शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाण्यासाठी ३६ आमदारांची यादी तयार करण्यात आली होती, तेव्हा घोलप यांचे नाव व स्वाक्षरी खूप वर होती, अशा शब्दांत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी टोला हाणला. एक ते दीड वर्षापूर्वी भुजबळ हे शिवसेनेत येणार होते. त्यांचा प्रवेश आपण रोखल्याचा दावा घोलप यांनी केल्यानंतर त्यास भुजबळ यांनी त्याच शैलीत प्रत्युत्तर दिले.
भुजबळ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत विकास कामांचा आढावा घेतला. नंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना घोलप यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली. आपण आजपर्यंत कधीही शिवसेनेत जायचे असल्याचे कुणाकडेही म्हटले नाही. कुणाला भेटायलाही गेलो नाही. कार्यकर्ते चर्चा करत असतील तर त्याबाबत माहिती नाही. घोलप यांनी काहीही कारण नसताना हा विषय काढला. घोलप हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत. त्यांना ज्या पक्षात जायचे, तिकडे त्यांनी जावे.
सध्या केवळ ते स्वत:ला निष्ठावान असल्याचे दर्शविण्याची धडपड करत असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. १९९१ मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. त्यात घोलपांची स्वाक्षरी खूप वर होती, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. धान्य वाटपात सर्व्हरच्या अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी आनंदाचा शिधाचे संच राज्यात सर्वत्र पोहोचले असल्याचा दावा केला. आता केवळ नागरिकांनी शिधा वाटप दुकानातून ते घेऊन जायचे असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सक्रियपणे काम करत आहे.
ओबीसी आरक्षण वाढविणे आणि त्यात मराठा समाजाचा समावेश करणे, यातील गोंधळ संपविण्यासाठी एक उपाय आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ओबीसी आरक्षणात १० टक्के वाढ करण्यासाठी आधीच केंद्राशी संपर्क साधला आहे. ओबीसी आरक्षणात कोणतीही कपात होता कामा नये, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आत्महत्या वा दगडफेक करून सुटणार नाही. चर्चेतून हा प्रश्न सोडविला पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वपक्षियांचे समर्थन आहे. सणोत्सवाच्या काळात गावात, समाजात वितुष्ट निर्माण व्हायला नको, याकडे त्यांनी लक्ष वेधले.