नाशिक : शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित असल्याचे गृहीत धरून काही दिवसांपासून तयारी करणारे ठाकरे गटाचे उपनेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीतून उमेदवार राहणार असल्याच्या चर्चेमुळे घोलप हे नाराज होते. त्यातच शिर्डीच्या संपर्कप्रमुखपदी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याने घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला.
या राजीनाम्याची दखल घेत घोलप यांना सोमवारी मातोश्रीवर चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख म्हणून घोलप हे कार्यरत होते. शिवसेना दुभंगल्यानंतरही त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही घोलप हे शिर्डीतून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यावेळी त्यांना डावलण्यात आले. उमेदवारी न दिल्याने खचून न जाता सलग पाच वर्ष शिर्डी मतदार संघात त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदावर अचानक आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत मला विश्वासात घेतले नाही. काही दिवसांपासून मी शिर्डी मतदार संघात संपर्क ठेवून आहे, असे बबन घोलप यांनी सांगितले.