नाशिक : शिवसेनेशी गद्दारी करणारा मग तो कुणीही असो, त्याला कदापि माफ केले जाणार नाही. त्याला घरातून निघणे मुश्किल करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बबन घोलप यांनी दिला आहे.
पाथर्डी परिसरात आयोजित मेळाव्यात घोलप यांनी मार्गदर्शन केले. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात मेळावे घेण्याचा धडाका ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी लावला आहे. या अंतर्गत पाथर्डी परिसरात मेळावा घेण्यात आला. व्यासपीठावर उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक केशव पोरजे, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, याचे आश्चर्य वाटते. खाल्ल्या मिठास जे जागत नाही ते दुसऱ्यांचे काय भले करणार? असा प्रश्न बागुल यांनी केला. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनीही गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. या लोकांना आम्ही सुखाने जगू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाजातील सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांतील गुण हेरून त्यांना मोठे केले. त्यापैकी काही नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री झाले. परंतु, असे असतांनाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करावी, याचे आश्चर्य वाटते. जे गद्दार निघाले त्यांचा आम्ही आमच्या पद्धतीने समाचार घेऊच, परंतु आगामी निवडणुकांत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे महानगरप्रमुख बडगुजर म्हणाले.