महाकुंभाचा हा कार्यक्रम हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व देशासाठी आहे. बंजारा समाजाच्या अस्मितेचा हुंकार म्हणजेच गोद्री येथील महाकुंभ आहे, असे प्रतिपादन पोहरागडचे बाबूसिंग महाराज यांनी केले.जामनेर तालुक्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना-नायकडा समाज महाकुंभ २५ ते ३० जानेवारी या कालावधीत होणार आहे. या महाकुंभाच्या ध्वजारोहणप्रसंगी प्रमुख साधुसंतांच्या हस्ते भगवा ध्वज आणि पांढर्या ध्वजाचे पूजन झाले. त्यानंतर ध्वज उभारण्यात आला.
हेही वाचा >>>जळगाव: शिंदखेड्यातील भूमी अभिलेख लिपिक लाच घेताना जाळ्यात
यावेळी संत गोपाल चैतन्य बाबा, संत सुरेश बाबा, संत रामसिंग महाराज, संत यशवंत महाराज, महंत जितेंद्र महाराज आदी संत, महंतांसह अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, क्रीडा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी संत जितेंद्र महाराज यांनी धर्मरक्षणासाठी हा कार्यक्रम असून, लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. संत कबिरदास महाराज यांनी देशाला जागृत करण्याचे काम गोरबंजारा समाजाने केले असल्याचे सांगितले. संत गोपाल चैतन्य महाराजांनी भारतात जन्मलेले सर्व हिंदू असून, समस्त हिंदू समाजाचा हा कुंभ असल्याचे सांगितले. महामंडलेशवर जनार्दन हरी महाराज यांनी, बंजारा समाज व हिंदू समाज संघटित होईल, कुंभाच्या माध्यमातून एकत्र होऊ, असे सांगितले. शरदराव ढोले यांनी धर्माचे रक्षण कराल तर देशाचे रक्षण होईल, असे मांडले.आपल्या राष्ट्राचा आधार हिंदुत्व असून त्याचा जागर आपल्याला वेळोवेळी करावा लागणार असल्याचे सांगितले. नंदकुमार गिरजे यांनी सूत्रसंचालन केले.