नाशिक : धार्मिक भेदभावापलिकडे जाऊन नोंदणी पध्दतीने आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या येथील रसिका आणि आसिफ या दाम्पत्यास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा देत हा लव्ह जिहाद नसल्याचे सांगितले. कथित धर्मरक्षकांच्या विरोधानंतर मुलीच्या वडिलांनी हिंदू धार्मिक विधीनुसार नियोजित विवाह सोहळा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर कडू यांनी हा विवाह होणारच, असा आडगावकर कुटुंबियांना धीर दिला. दोघा कुटुंबियांची संमती असतांना इतरांनी यात लुडबुड करु नये, अशी तंबीही त्यांनी दिली.
येथील सराफी व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका तसेच मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पध्दतीने झाला आहे. त्यानंतर हिंदू धार्मिक विधीनुसार १७ जुलै रोजी नाशिक येथे नातेवाईक तसेच मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा करण्याचे आडगावकर यांनी निश्चित केले होते. सोहळ्याची उत्साहात तयारी सुरू असतांना लग्नपत्रिका सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यानंतर या विवाह सोहळ्याला वेगळेच वळण लागले. काही सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटना या विवाहाविरोधात एकटवल्या. हा विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा संदेश पसरविला गेला. हा विवाह सोहळा थांबविण्याची मागणी करण्यात येऊ लागली. कथित धर्मरक्षकांकडून धमक्याही देण्यात आल्या. विरोध आणि धमक्यामुळे अस्वस्थ झालेल्या आडगांवकर यांनी अखेर हा विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा- एका लग्नाच्या सामाजिक आडकाठीची गोष्ट
लव्ह जिहादचा प्रकार नाही
याची दखल घेत राज्यमंत्री कडू यांनी शुक्रवारी आडगांवकर कुटुंबियांची भेट घेतली. रसिका आणि आसिफशीही त्यांनी चर्चा केली. रसिकाला होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी यातून काढलेला मार्ग पाहता हा लव्ह जिहादचा प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले.
इतरांनी लुडबुड करण्याचे कारण काय?
मुलगा आणि मुलगी दोघेही आपला धर्म न बदलता विवाह करत असतील तर त्यात इतरांनी लुडबुड करण्याचे कारणचं काय, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला. राजर्षि शाहू महाराजांना अपेक्षित कार्यानुसारच हे होत असून ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीला जातीचे वळण लावले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा विवाह सोहळा निश्चितच होईल आणि रसिका अपंग असल्याने एक कार्यकर्ता म्हणून विवाहास आपण उपस्थित राहू, असे नमूद करीत कडू यांनी लग्नाला पाठिंबा दिला.