नाशिक – करोना काळात घेतलेले तीन हजार सिलिंडर वापराविना… अस्ताव्यस्त पडलेले वैद्यकीय साहित्य… अतिदक्षता कक्षात सुविधांचा अभाव…तळ मजल्यावर गळतीमुळे साचलेले पाणी… कचरा… दिवसातून एकदाच म्हणजे सकाळीच होणारी वैद्यकीय तपासणी… आवाराचे वाहनतळात झालेले रुपांतर, ही स्थिती आहे महानगरपालिकेच्या नाशिकरोड येथील मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची. ही अवस्था पाहून खुद्द प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर संतप्त झाले. रुग्णालयातील प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आयुक्तांच्या दौऱ्यामुळे तरी या रुग्णालयाची दुरवस्था बदलणार का, असा प्रश्न रुग्णांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनपा आयुक्त डॉ. करंजकर यांनी अकस्मात मनपाच्या रुग्णालयास भेट देऊन विविध कक्षांची पाहणी केली. शिशुकक्षात तर कुणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. संबंधित डॉक्टर इतरत्र सेवा देत असल्याचे सांगण्यात आले. सर्वसाधारण कक्षातील रुग्णांशी डॉ. करंजकर यांनी संवाद साधला. तेव्हा डॉक्टर दिवसातून केवळ एकदाच म्हणजे सकाळी रुग्णांची तपासणी करत असल्याचे उघड झाले. सायंकाळी डॉक्टर तपासणीसाठी येत नसल्याच्या तक्रारींचा पाढा रुग्णांनी वाचला. रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाण्याची गळती होत आहे. इतर मजलेही त्याला अपवाद राहिले नाहीत. ठिकठिकाणी होणारी गळती थांबविण्याची सूचना करण्यात आली. तळमजल्याच्या खालील भागात गळतीमुळे साठलेले पाणी, माती, कचरा त्वरित उचलून परिसराची स्वच्छता करण्याचे निर्देश देण्यात आले. या भेटीप्रसंगी एका सुरक्षारक्षकाने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी कर व प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, आस्थापना विभागाचे अधीक्षक रमेश बहिरम उपस्थित होते.

हेही वाचा – नाशिक: बापानेच लेकाच्या जीवाचा केला सौदा, पालखेड धरण परिसरातील हत्येचं गूढ उलगडलं

सिलिंडर वापरात आणण्याची सूचना

अतिदक्षता कक्षात आवश्यक त्या सुविधा नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी मोठ्या संख्येने वैद्यकीय उपकरणे आणि साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे निदर्शनास आले. करोना काळात महानगरपालिकेने सुमारे तीन हजार प्राणवायू सिलिंडर घेतले होते. हे सिलिंडर आजही न वापरता मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात पडून असल्याचे डॉ. करंजकर यांच्या लक्षात आले. ही प्राणवायू सिलिंडर तातडीने वापरात आणण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना केली. रुग्णालय आवारात उभारलेल्या प्राणवायू प्रकल्पावर सुरक्षारक्षक नियुक्तीचे आदेश देण्यात आले.

रुग्णालय सुरक्षा धोक्यात ?

या रुग्णालयात तीन बाजूने ये-जा करण्याची व्यवस्था आहे. परंतु, एकाही ठिकाणी दरवाजा नाही. त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ तीनही ठिकाणी दरवाजे बसविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रुग्णालय आवारात पोलीस चौकी उभारली आहे. परंतु, ती कार्यान्वित नाही. या चौकीत २४ तास पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत पोलीस विभागाला पत्र देऊन कायमस्वरुपी बंदोबस्त मागविण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा – जळगाव : चाळीसगावजवळ खासगी प्रवासी बसला अपघात; तीन जण जखमी

आवारात खासगी वाहनतळ

रुग्णालय इमारतीच्या तळमजल्यात आणि आवारात विनापरवाना मोठ्या संख्येने खासगी मालकीची वाहने दररोज उभी केली जातात. संबंधितांनी रुग्णालयाचे आवार वाहनतळ बनवले आहे. वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad condition of balasaheb thackeray hospital in nashik ssb