लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: वर्ण व्यवस्थेमुळे विद्रोह झाला. ब्राम्हण महिलांनाही शिक्षण, जगण्याचा अधिकार नव्हता. महिलांना तो अधिकार बहुजन समाजातील महात्मा फुले यांनी मिळवून दिला. त्यांना काही सनातनी मंडळींनी विरोध केला. शाळा नसत्या तर महाराष्ट्राची, महिलांची काय अवस्था झाली असती, याचा सर्वांनी विचार करावा. बहुजन समाजाने आता वेद शिकण्याचा, वेदोक्त मंत्र म्हणण्याचा आग्रह धरावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
पंचवटीतील प्रसिध्द श्री काळाराम मंदिरात कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिताराजे यांचा पूजा विधीवरून महंत सुधीरदास पुजारी यांच्याशी वाद झाल्याचे उघड झाल्यानंतर त्याचे विविध पातळीवर पडसाद उमटत आहेत. शनिवारी आमदार आव्हाड यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर महंतांच्या कार्यपध्दतीचा निषेध केला. पूजाविधीवेळी राणी साहेबांसमवेत जे झाले, तो गादीचा अपमान आहे. शिवाजी महाराजांच्या वारसदारांना संबंधित शुद्र समजत असतील तर इतर मातीत गेले, अशी टीका आव्हाड यांनी महंतांवर केली.
पुराणोक्त, वेदोक्त वर्णव्यवस्था सनातनी धर्मातून निर्माण होते. ती वर्णव्यवस्था नसावी, अशी इच्छा व्यक्त करणारा मी बहुजन आहे. समाजात वाढत चाललेला द्वेष, जातीय कटूता, भेदभाव नष्ट करावा. वर्णव्यवस्था निर्माण होणे धर्माला घातक असून कधीतरी देशात, राज्यात वर्णच राहू नये, अशी आपण प्रार्थना केल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
संविधानाने कायद्यासमोर सर्व समान आहेत. महंत सुधीरदास यांच्याशी चर्चा करायची होती. परंतु, मंदिरात एकही महंत भेटले नाहीत. भेट झाली असती तर चर्चा झाली असती. आपण धर्माभिमानी हिंदू असून सर्वधर्मियांचा मान ठेवला जावा हे आपल्या धर्माने शिकविले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.