‘सावाना’ शतकोत्तर अमृत महोत्सव कार्यक्रमात व्याख्यान; कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी
सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, रविवारी सकाळी दहा वाजता भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील याचिकाकर्ते डॉ. स्वामी यांच्या संरक्षणार्थ हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्या आहेत. मागील महिन्यात उपरोक्त प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वामींच्या विरोधात देशभरात निदर्शने केली होती. या घडामोडींमुळे केंद्र सरकारने त्यांना झेड दर्जाचे सुरक्षा कवच दिले आहे. असे असले तरी त्यांच्या नाशिक दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे संरक्षण कवच सज्ज राहणार आहे.
१८४० मध्ये स्थापना झालेल्या सावानाला १७५ वर्षे पूर्ण झाल्याने यंदा शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त या वर्षांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातील पहिले व्याख्यान स्वामी यांचे ‘भारत – काल, आज आणि उद्या’ या विषयावर होईल. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात हा कार्यक्रम होणार आहे. विविध कारणांस्तव स्वामी हे वादाच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या व्याख्यानासाठी विषय निवडताना सावानाने नाहक कोणत्या नवीन वादाला निमंत्रण मिळणार नाही, याची खबरदारी घेतली. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसच्या प्रमुखांना न्यायालयात खेचल्याने स्वामी हे काँग्रेसच्या विरोधक यादीत अग्रस्थानी पोहोचले. उपरोक्त प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना जामीन मिळाल्यानंतर काँग्रेसजनांनी ठिकठिकाणी स्वामी आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलने केली होती. या घडामोडी सुरू असताना केंद्र सरकारने सुरक्षिततेसाठी त्यांना देशभरात झेड दर्जाची सुरक्षितता बहाल केली आहे. याआधी त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही व्यवस्था होती. पण ती तामिळनाडू राज्यापुरतीच मर्यादित असल्याचे सांगण्यात येते. झेड दर्जाच्या सुरक्षिततेसाठी सर्वसाधारणपणे ४० कमांडो तैनात असतात. तसेच अशा व्यक्तींच्या दौऱ्याप्रसंगी स्थानिक पोलिसांकडून सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातात.
उपरोक्त व्यवस्थेबरोबर स्वामींना या दौऱ्यावेळी बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे संरक्षण कवच लाभणार आहे. परिवारातील अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यास सर्वसाधारपणे स्थानिक कार्यकर्ते ही व्यवस्था करतात, असे बजरंग दलाचे महानगर संघटक विनोद थोरात यांनी सांगितले. स्वामी यांच्या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बजरंग दलाचे ५० ते १०० कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण दौऱ्यात त्यांना संरक्षण देण्यासाठी तीन पाळीत कार्यकर्ते काम करतील. तसेच पोलीस यंत्रणेने त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी काय व्यवस्था केली आहे, याची माहिती पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन घेतली जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. दरम्यान, स्वामी यांच्या कार्यक्रमावेळी आवश्यक ते संरक्षण उपलब्ध करावे, अशी मागणी ‘सावाना’मार्फत पोलिसांकडे करण्यात येणार असल्याचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा