नाशिक – अशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी बाळासाहेब क्षीरसागर तर उपसभापतीपदी गणेश डोमाडे यांची बिनविरोध निवड झाली. या बाजार समितीत दोन्ही गटांना एकत्र आणण्यात माजीमंत्री छगन भुजबळ यांनी शिष्टाई केली.
हेही वाचा >>> नाशिक: बुडाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांचा मृत्यू
लासलगाव बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. निवडणुकीत दोन्ही गटांना समसमान जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या समितीत सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. माजीमंत्री भुजबळ यांनी शिष्टाई करुन दोनही गटातील उमेदवारांना एकत्र बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये माजी आमदार वसंत गिते, हेमंत धात्रक, प्रकाश दायमा यांनी महत्वाची भूमिका बजावली. निवडणुकीत भुजबळ यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभापतिपदी संधी देण्यात आली. तर पंढरीनाथ थोरे यांच्या गटातील तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापतिपदी संधी देण्यात आली. दोन्ही गटांना एकत्र आणून भुजबळांनी समितीवर आपले वर्चस्व कायम राखले. लासलगाव आणि येवला बाजार समितीच्या निवडणुकीत नियोजनाची जबाबदारी भुजबळांनी दिलीप खैरे यांच्यावर सोपविली होती.