अविनाश पाटील
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच भ्रष्टाचाराचा आरोप केलेले राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार बाळासाहेब सानप यांनी रविवारी मुंबई येथे ‘मातोश्री’ गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधल्याबद्दल स्थानिक राजकारणात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सानप हे भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष असून नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्यावर लगोलग ते राष्ट्रवादीचे उमेदवार झाले होते.
सानप हे २० ते २२ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. महापालिकेवर भाजपला सत्ता मिळवून देण्यात शहराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण ठरले होते. जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अगदी काही दिवसांपर्यंत विश्वासू समजले जाणारे सानप आणि महाजन यांच्यात बिनसल्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीत सानप यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या सानप यांनी लगोलग राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली होती. त्यांच्यासाठी मनसेने अशोक मुर्तडक यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले होते. प्रचारादरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेली सानप यांची भेटही चांगलीच गाजली.
सानप यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभाही घेतली. सानप यांच्यामुळे निवडणूक चुरशीची झाल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रचार संपण्याआधी गोदाकाठावर सभा घेऊन पारदर्शकतेला तिलांजली देत सानप यांचा कारभार भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हाऊ लागल्याने त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली, असे कारण दिले होते. या निवडणुकीत मनसेमधून भाजपमध्ये आलेल्या राहुल ढिकले यांच्याकडून सानप यांना पराभव स्वीकारावा लागला.
निकालानंतर शुक्रवारी शहरातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जिल्ह्य़ातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे विजयी आणि पराभूत उमेदवारांचा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी भुजबळ यांनी सानप यांचा विशेष उल्लेख करून त्यांच्या संघटन कौशल्याचा वापर करून घेण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येईल, असे नमूद केले होते; परंतु ही जबाबदारी खांद्यावर पडण्याआधीच सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला.