जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारुपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवास शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. तरुण पिढीने ऐकावा आणि जुन्या पिढीनेही ऐकावा, असा हा स्वरोत्सव आहे. महोत्सवाचा समारोप आठ जानेवारी रोजी होणार आहे.
वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे २१ वा बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात सायंकाळी सात ते ११ या वेळेत होणार आहे. शुक्रवारी उद्घाटन सोहळ्यानंतर प्रथम सत्रात उमेश वारभुवन (परकिशन), आशय कुलकर्णी (तबला), रोहित कुलकर्णी (किबोर्ड), विनय रामदासन (गायन), अभिषेक भुरूक (ड्रम्स) आणि संदीप मिश्रा (सारंगी) यांचा फ्युजन बँड होणार आहे. द्वितीय सत्रात तरुण, आश्वासक व बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे सौरव आणि गौरव मिश्रा यांची कथक जुगलबंदी होणार आहे. त्यांना दिल्ली येथील प्रख्यात तबलावादक उस्ताद अक्रम खान साथसंगत करतील.
हेही वाचा – जळगाव : नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एकाला पाच हजारांचा दंड
दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रतिभासंपन्न कलाकारांच्या माध्यमातून होईल. चित्रवेणू या नवीन वाद्याची निर्मिती करणारे पंडित उदय शंकर हे आपली कला सादर करणार असून त्यांना तबलासंगत मुंबईचे रामकृष्ण करंबेळकर करतील. द्वितीय सत्रात पंडित जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, तर संवादिनीवर अभिषेक रवंदे साथसंगत करतील. तिसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात सहगायन होणार आहे. मुंबईचे गायक तथा गुरू पंडित डॉ. राम देशपांडे आणि त्यांचा मुलगा गंधार देशपांडे हे शास्त्रीय व उपशास्त्रीय सहगायन करतील, त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर, तर संवादिनीवर अभिषेक रवंदे साथसंगत करतील.
बालगंधर्व महोत्सवाचा समारोप थ्री जनरेशन कॉन्सर्ट अर्थात तीन पिढ्यांच्या मैफलीने होणार असून, पद्मभूषण व ग्रॅमी अवॉर्ड विजेते पंडित विश्वमोहन भट (मोहन वीणा), पंडित सलिल भट (सात्त्विक वीणा) आणि अथर्व भट (गिटार) यांचे सहवादन होणार आहे. महोत्सवाच्या तिन्ही दिवसांचे सूत्रसंचालन मुंबईच्या दीप्ती भागवत करतील. जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.