उद्यापासून तीन दिवस सोहळा
शेतकऱ्यांचा देव म्हणून पुजल्या जाणाऱ्या ‘बळी’चे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर अशी प्रसिद्धी असलेल्या पंचवटीतील श्री बळी महाराज या नवीन मंदिरात मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. हे मंदिर उभारण्यासाठी सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाचाच हातभार लागला असून सुमारे दीड कोटी रुपये खर्च आलेले हे मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहराचे धार्मिक महत्त्व अधिक वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे.
नाशिकची ओळखच मुळात मंदिरांचे शहर अशी. आडगाव आणि हनुमाननगर यादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर प्रारंभी अगदी लहान स्वरूपात बळी मंदिर होते. परिसरातील नागरिकांप्रमाणेच महामार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी हे मंदिर म्हणजे पूजनीय ठरले. महामार्गाचे विस्तारीकरण सुरू झाल्यानंतर मंदिर स्थलांतरित करण्याचा प्रश्न उद्भवला. स्थानिकांनी मंदिर स्थलांतरास विरोध केल्यानंतर काही ज्येष्ठ मंडळींच्या मध्यस्थीनंतर मंदिर स्थलांतर करण्यास स्थानिकांनी अनुकूलता दर्शविली. सुमारे चार वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी भरधाव वाहनाने मंदिराच्या मागील बाजूस धडक दिली. यामुळे मंदिराचे नुकसान झाले. या अपघातानंतर मंदिर स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला. महामार्गालगत रासबिहारी शाळेसमोरील जागा त्यासाठी निश्चित करण्यात आली. या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आर्थिक तरतूद करणे महत्त्वाचे होते. त्यानुसार श्री बळी महाराज अमर मित्रमंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले. सर्वाना मदतीचे आवाहन करण्यात आले. बघता बघता आर्थिक निधीसह वेगवेगळ्या साहित्याच्या स्वरूपात मदत जमा होऊ लागली. मंदिराच्या कामास हळूहळू सुरुवात करण्यात आली. मंदिर आकार घेऊ लागले.
काही वर्षांच्या प्रयत्नानंतर सर्वाचे लक्ष वेधून घेईल असे बळी महाराज मंदिर भव्य स्वरूपात आकारास आले. या मंदिरात बळी महाराज मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शनिवारपासून सुरुवात होणार आहे. स्वामी माधवगिरी महाराज यांच्या हस्ते १४ डिसेंबर रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त शनिवारी मिरवणूक काढण्यात येणार असू रविवारी महायज्ञ होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. देवयानी फरांदे, आ सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मंदिर उभारणीसाठी असंख्य हात लागले असले तरी बळी महाराज अमर मित्रमंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न त्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा