जळगावप्रमाणेच नाशिकमध्ये जैन समाजाच्या निर्णयांची प्रतीक्षा
विवाह व धार्मिक सोहळ्यांमध्ये भोजनावर होणारा भरमसाट खर्च लक्षात घेत भोजनात मर्यादित खाद्यपदार्थ ठेवण्यासह रस्त्यावर मुली व महिलांना नृत्य तसेच आतषबाजी, अक्षदा या कार्यक्रमांना बंदी, असे निर्णय जळगाव येथील जैन समाजाने घेतले असून, त्यासंदर्भात डिसेंबर महिन्यात पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. १ जानेवारीपासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जळगाव शहर व तालुक्यापुरते मर्यादित असणारे हे समाज परिवर्तनशील निर्णय नाशिक जिल्ह्य़ातील जैन बांधवांकडूनही स्वीकारार्ह असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
समाज परिवर्तनाच्या दृष्टीने उचललेले हे आश्वासक पाऊल असल्याची प्रतिक्रिया या निर्णयावर जळगावच्या जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा सकल जैन समाज परिवर्तन समितीचे प्रमुख अशोक जैन यांनी व्यक्त केली आहे. जळगावच्या आर. सी. बाफना स्वाध्याय भवनात आयोजित जैन समाजाच्या चारही संघांच्या सदस्यांसाठी सकल संघाच्या वतीने संयुक्त सभा घेण्यात आली. बैठकीस संघपती दलूभाऊ जैन, मूर्तिपूजक संघाचे प्रतिनिधी, दिगंबर जैन संघाचे संघपती राजेश जैन, तेरा पंथ जैन संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आर्थिक सुबत्ता दाखविण्यासाठी विवाह कार्यात अनावश्यक खर्च केला जातो. लग्नपत्रिका, भोजन, आतषबाजी यासह इतर अनेक गोष्टींमध्ये नाहक खर्च केला जातो. सामाजिकदृष्टय़ा कूप्रथांना तिलांजली देण्यासाठी अनावश्यक खर्चाना पायबंद घालण्याची जाणीव यावेळी अशोक जैन यांनी करून दिली.
विवाह कार्यात अन्नपदार्थाची संख्या मर्यादित असावी याबाबत ध्येय धोरणाचा मसूदा तयार करण्यात आला आहे. मसुदा समितीचे ज्येष्ठ सदस्य दिलीप गांधी यांनी तो वाचून दाखविला. रस्त्यावर मुली व महिलांना नृत्य करण्यास, फटाक्यांच्या आतषबाजीस बंदी घालण्यात आली आहे. महिलांचे संगीत कार्यक्रमही होणार नाहीत. झालेच तर ते केवळ कुटुंबांपुरताच मर्यादित राहतील. लग्न वेळेवर लागेल याकडे कटाक्ष ठेवण्यात येईल. लग्न वा स्वागत सोहळा सकाळच्या वेळीच ठेवणे. अडचण असेल तरच सायंकाळी परवानगी मिळू शकते, विवाहात अक्षदा प्रथा बंद करणे, या नियमांचा मसुद्यात समावेश आहे. नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या वर व वधू पक्षाच्या प्रमुखाचा संघाद्वारे सन्मान केला जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्या समाज बांधवांकडे शुभेच्छा देण्यासाठी संघाचे प्रतिनिधी जातील. परंतु कोणीच भोजन घेणार नाही. हे नियम जळगाव शहर व तालुक्यासाठी लागू असतील.
धार्मिक सोहळा किंवा विवाह भोजनात परिवर्तनासाठी कमी करण्यात आलेल्या पदार्थाची संख्या पुढीलप्रमाणे- नाश्त्यासाठी नऊ पदार्थाची मर्यादा. त्यात तीन प्रकारचे स्नॅक्स तसेच मिठाई, चहा, कॉफी किंवा दूध, रस, बिस्कीट वा खारी यांचा समावेश असेल. भोजनात २१ पदार्थाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यात तीन मिठाई, चार भाज्या, तीन स्नॅक्स, एक पाणी पुरी, एक सलाड, एक पापडे, दोन रस, आइस्क्रीम, कुल्फी, दाल-भात, रोटी, दोन इटालियन, चायनीज, थाई अथवा इतर पदार्थ. कुंकुम सोहळ्यात ड्रायफ्रुट, आइस्क्रीम, रस, दूध व एक इतर पदार्थ राहील. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमातील भोजनात १० पदार्थ राहतील. या पद्धतीचे नियम समाजबांधवांसमोर ठेवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिकमध्ये काही प्रमाणात यश
नाशिक शहर व जिल्ह्य़ातही विवाह तसेच सामुदायिक सोहळ्यांमध्ये होणारी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी जनजागृतीचे प्रयत्न आधीपासूनच करण्यात येत असून, अशा सोहळ्यांमध्ये अन्न वाया जाऊ नये यासाठी सूचना देण्यात येतात. धार्मिक तसेच इतर सामुदायिक सोहळ्यांमध्ये त्याविषयी प्रयत्नांना यश येत असले, तरी विवाह सोहळ्यांमध्ये त्या प्रमाणात अधिक यश अद्याप आलेले नाही.
– नंदकिशोर साखला, सदस्य, भारतीय जैन संघटना

आगरी समाजाचाही लग्नातील खर्च टाळण्याचा निर्णय
इगतपुरी तालुक्यातील आगरी समाजाने यापुढे विवाह सोहळ्यात होणारा वारेमाप खर्च व मानपान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमातच विवाह उरकण्याचेही सर्वसंमतीने ठरविण्यात आले. व्यसनाधीनता रोखण्यासाठी लग्नात दारू बंद करण्यात आली आहे. दुपारची वेळ असलेले लग्न सायंकाळी लागत असल्याने समाजाची नाचक्की होत असल्याचे लक्षात घेत लग्न वेळेत पार पाडण्यात येणार आहे. डीजेचा वापरही मर्यादित करण्यात येणार आहे. इगतपुरी तालुका आगरी समाजाची घोटी येथे बैठक झाली. त्यात हे निर्णय घेण्यात आले.
आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबुलाल भोर अध्यक्षस्थानी होते. आगरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणपतदादा कडू, ज्येष्ठ नेते जनार्दन माळी, देवराम मराडे, रघुनाथ तोकडे, शिवसेना तालुका अध्यक्ष भगवान आडोळे, आदी उपस्थित होते.
आगरी समाजाच्या उन्नतीसाठी समाजाने पक्षीय राजकारण न आणता समाजहितासाठी सक्रियतेने कार्यरत राहण्याचा संकल्प करण्यात आला. ए. जी. भागडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अरुण भागडे यांनी मानले.