लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात सकल हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला भद्रकाली, जुने नाशिक परिसरात हिंसक वळण लागल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर तसेच लाठीमार करावा लागला. मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढविण्यात आल्याने सायंकाळी परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.
बांगलादेशात हिंदुंवर अत्याचाराच्या निषेधार्थ शहरात सकल हिंदू समाजाने शुक्रवारी बंदची हाक दिली होती. शहरातील महात्मा गांधी रोड, मेनरोड, पंचवटी, नवीन नाशिक, नाशिकरोड, सातपूरसह इतर भागात बंद शांततेत असताना भद्रकाली, जुन्या नाशिक भागात काही अतिउत्साही मंडळींमुळे वाद निर्माणझाला. नियोजित वेळेत मोर्चा निघण्याआधी एका गटाकडून काढण्यात आलेल्या वाहन फेरीतून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. दूध बाजार, पिंपळचौक, भद्रकालीत दुसऱ्या गटाने दुकाने बंद करण्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूने जमाव समोरासमोर आला. दोन्ही गटाकडून घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांना दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. परंतु, दोन्ही गटांकडून दगडफेक सुरु झाली. दुकानांची तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे या भानगडीशी काहीही संबंध नसलेले नागरिक भयभीत झाले.
आणखी वाचा-नाशिक : भावडबारी-रामेश्वर फाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन
संत गाडगेबाबा चौकात मंडप उभारणीचे काम सुरू असताना एका गटाने तेथील बांबू उचलत त्याच लाठीने दुकाने फोडण्यास सुरूवात केली. भद्रकाली तसेच मदतीला आलेल्या पंचवटी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. जमाव ऐकत नसल्याने पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. दगडफेकीत वाहने आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दोन्ही बाजूंकडून चिथावणीखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आणखी वाचा-नाशिक: नगरसूल शिवारात बिबट्याचा वावर, शेळीवर हल्ला
पोलीस अधिकारीही जखमी
भद्रकाली, जुने नाशिक परिसरात दगडफेक सुरु असतानाही काही जणांनी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न केला. काही समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. शालिमारसह जुने नाशिक परिसरातील रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता. जखमी झालेल्यांची मंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट घेतली.