हरितकुंभ माहितीपट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात महापालिकेला सूचना

सिंहस्थ कुंभमेळ्यात आयोजित हरितकुंभ माहितीपट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुद्राज गोसावी आणि विशाल पाटील यांच्या ‘माझं नाशिक, माझी गोदावरी’ या माहितीपटाने मिळविले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण बुधवारी विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी शहरात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर प्रतिबंध आणण्याच्या सूचना महापालिकेला करण्यात आल्याचे सांगितले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात हरितकुंभ बैठकीत राज्यस्तरीय हरितकुंभ माहितीपट स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, साहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमोडे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, राजेश पंडित आदी उपस्थित होते. माहितीपट स्पर्धेत शंतनू चंद्रात्रे यांच्या ‘एहसास’ आणि प्रवीण पाटील यांच्या ‘गोदावरीचं भविष्य, हे आपलंच कर्तव्य’ या लघुपटांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. प्रसाद देशपांडे यांच्या ‘गंगा माता का दर्द’ लघुपटास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. उत्कृष्ट संहितालेखनासाठी दीप्ती चंद्रात्रे, सुनेत्रा महाजन आणि प्रवीण पाटील, उत्कृष्ट चित्रीकरणासाठी सी. डी. देशमुख, किरण जोशी यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी डवले यांनी कुंभमेळ्यात प्रथमच ‘हरितकुंभ’ ही संकल्पना सर्व स्तरांवर राबविण्यात आल्याचे सांगितले. त्यासाठी प्रशासनासह नागरिक, आलेले साधू-महंत आणि भाविक ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी सक्रिय राहिले. मात्र पर्वणीनंतर देखील ही संकल्पना मूर्त स्वरूपात राहावी, यासाठी विविध माध्यमांतून सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. यासाठी लोकसहभागावर लक्ष केंद्रित केले असून यानिमित्त विविध स्पर्धा सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.
पर्यावरण रक्षण सर्वाच्या सहभागातून शक्य आहे. चित्रकला, रांगोळी, माहितीपट आदी स्पर्धाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासंबंधी चांगल्या कल्पना समोर आल्या. स्पर्धकांनी जबाबदारीच्या भावनेने स्पर्धेत सहभाग घेऊन चांगली निर्मिती करण्याचा प्रयत्न केला, अशा स्पर्धामुळे नव्या निर्मितीसोबत नव्या प्रतिभेलाही संधी मिळते. गोदा प्रदूषणमुक्तीचा जागर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागांत करण्यासाठी हे माहितीपट उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गोदावरी नदी परिसरात प्लास्टिक ग्लास आणि थर्माकोलची थाळी आदींचा उपयोग थांबवावा. त्यावर बंदी आणण्यासाठी महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी, अशी सूचना डवले यांनी केली. बैठकीत पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या उपक्रम व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. ‘हरितकुंभ’ संकल्पना चिरस्थायी राहावी, यासाठी प्रशासन शहरात प्लास्टिक तसेच थर्माकॉल वापरावर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी पिशव्या वापराव्यात यासाठी आवाहन आणि प्रबोधन करण्यात येईल. तसेच गोदाकाठासह घाट परिसर स्वच्छ राहावा, याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader