संबंधितांना रात्री बँकेत मुक्कामी थांबण्याची पोलिसांची सूचना
सुरक्षाव्यवस्था नसलेल्या बँकामध्ये संबंधित शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी रात्री मुक्कामी थांबून सुरक्षा व्यवस्था पहावी अशा लेखी सूचना मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी विभागातील सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खासगी बँकाना दिल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांवर मागील काही महिन्यांपासून दरोडय़ांचे सत्र सुरू असून त्यात कोटय़वधीची रक्कम लंपास झाली आहे. या बँकेच्या एका शाखेतील लॉकरवरही दरोडेखोरांनी डल्ला मारला. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुन्हा घडल्यास हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले असे गृहीत धरून बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहआरोपी करणे भाग पडेल, असे सूचित करण्यात आले आहे. या सुचनेमुळे बँकिंग वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.
सध्या ग्रामीण भागातील बँकांमध्ये दरोडा व घरफोडय़ांच्या गुन्ह्यांत लक्षणिय वाढ होत आहे. बँक व्यवस्थापकांना सुरक्षा रक्षक नेमणे, सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे व बँकाची रोकड तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाखेत ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तरी देखील जबरी चोरी वा घरफोडी सारखे गुन्हे घडले आहेत. या पाश्र्वभूमीवर, उपविभागातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बँक व्यवस्थापकांनी पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे गुन्हे घडले असून असा गुन्हा घडल्यास हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले असे गृहीत धरले जाईल आणि नाईलाजाने संबंधित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहआरोपी करणे आम्हास भाग पडेल असे डॉ. खाडे यांनी बैठकीत सांगितले. पोलीस यंत्रणेचे हे बोल ऐकल्यावर उपस्थितात अस्वस्थता, चलबिचल पसरली.
सर्व बँकांमध्ये २४ तास शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. खर्च वाचविण्यासाठी अनेक बँका ही व्यवस्था करत नाही.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि सायरन तितकेच निगडीचे आहेत. दरवाजे व खिडक्यांना मजबुत लोखंडी ग्रील लावलेले असावेत, लॉकर व स्ट्राँगरूमसाठी त्रिस्तरीय सुरक्षा कवचासह स्वतंत्र कक्ष तयार करावा असे निर्देशही डॉ. खाडे यांनी दिल्या. मोठय़ा रकमांची देवाणघेवाण करतेवेळी पोलिसांची मदत घ्यावी. या रकमेची वाहतूक करताना गोपनियता बाळगणे तितकेच आवश्यक आहे. बँकेच्या आत व बाहेर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, बँक शाखा निर्जन ठिकाणी असल्यास ते भरवस्तीत स्थलांतरीत करावे असेही सूचित करण्यात आले. या सुचनांचे काटेकोर पालन न केल्यास आगामी काळात बँकेत गुन्हे घडल्यास शाखा अधिकाऱ्यांना व्यक्तीश जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या सूचनांमुळे अस्वस्थ झालेल्या बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर आपली व्यथा मांडली. सुरक्षा रक्षक नेमण्याचा अधिकार बँकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना आहे. स्थानिक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांनी वरिष्ठांकडे वारंवार सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तक्रारी, रक्कम वाहतुकीसाठी लागणारा खर्च, सुरक्षिततेच्या संबंधी उपाययोजना करण्याबाबत वरिष्ठांकडे वारंवार मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. अशा स्वरूपाच्या बैठका जिल्हा व विभागीय पातळीवर घेवून बँकेच्या विभागीय व्यवस्थापकांना त्यासाठी बोलवावे, असेही काही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीस मनमाड विभागातील मनमाड, येवला, चांदवड, वडनेर वैभव येथील सर्व पोलीस निरीक्षक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच शहरांमधील स्टेट बँक, देना बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, एचडीएफसी व आयसीआयसीआय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या शाखा, स्थानिक सहकारी बँका व पतसंस्था यांचे शाखा व्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader