Shitkada Waterfall Bees Attacked on Tourists : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवरील हरिहर गडाजवळील प्रसिध्द शितकडा धबधब्यावर प्रस्तरावारोहण करण्यासाठी जमलेल्या पर्यटकांवर वर रविवारी दुपारी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले. जखमी आणि हल्ल्यापासून बचावलेले हे सर्व जण कल्याण, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील आहेत. रॅपलिंगसाठी तयारी सुरू असताना निरीक्षणासाठी उडवलेल्या ड्रोनमुळे मधमाश्यांनी गिर्यारोहकांवर हल्ला केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरिहर गड आणि भास्कर गड डोंगर रांगेतील सर्वात मोठा आणि अवघड धबधबा म्हणून शितकड्याची ओळख आहे. दुर्गम जंगल भागात हा सुमारे ३५० फूट उंचीचा धबधबा आहे. कल्याण येथील एक संस्था तीन महिन्यांपासून हरिहर गडापासून सहा ते सात किलोमीटरवरील शितकडा धबधबा येथे ‘वॉटरफॉल रॅपलिंग’ या साहसी उपक्रमाचे आयोजन करीत आहे. प्रशिक्षक आणि तंत्रज्ञांच्या पथकांसह सर्व व्यवस्था त्यांच्याकडे असते. ड्रोनद्वारे सर्व बाबींवर काटेकोरपणे लक्ष दिले जाते. रविवारच्या उपक्रमासाठी दक्षिणेकडील राज्यासह गुजरात आणि कल्याणमधील असे ५० पेक्षा अधिक महिला-पुरुषांनी सहभाग घेतला होता. हे सर्व जण सकाळी १० वाजता हरिहर गडा्च्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावी पोहोचले. दीड ते दोन तास डोंगर चढून त्यांनी शितकडा धबधबा गाठला. प्रशिक्षकांनी धबधब्यावरील प्रस्तरावारोहणाची तयारी सुरू केली. निरीक्षणासाठी १२ वाजता हवेत ड्रोन उडवले गेले. ड्रोनचा आवाज अथवा हवेतील भ्रमंतीत मधमाश्यांच्या पोळ्याजवळ ड्रोन गेल्याने मधमाश्यांची झुंड बाहेर पडली. हे लक्षात येताच प्रशिक्षकांनी जमलेल्या सर्वांना जमिनीवर झोपून खबरदारी घेण्याचे आवाहन केले. कोणी उभे राहू नये, असे सूचित केले. प्रशिक्षक क्रिश जयस्वाल यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्यांना वाचविण्यासाठी धडपड केली. मधमाश्यांच्या हल्ल्यात तेही जखमी झाले. अन्य २० ते २५ जणांना मधमाश्यांनी चावा घेतला. अर्धा ते एक तास मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू होती.

ड्रोनचा आवाज किंवा कुठेतरी पोळ्याच्या समीप ड्रोन गेल्याने मधमाश्यांचा हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे. ड्रोन उड्डाण थांबविल्यानंतर काही वेळात मधमाश्या माघारी फिरल्या. नंतर तासभर सारेजण शितकडा परिसरात थांबून होते. तासाभराने धबधब्यापासून सर्वांना सुखरुपपणे खाली आणण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. उपरोक्त हल्ल्यानंतर साहसी उपक्रमावेळी ड्रोन पूर्णत: बंद ठेवण्यात आले. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले सर्व जण सुखरुप असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा… Maharashtra News Live : पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, तीन प्रवासी गंभीर जखमी!

अत्तरावर संशय

धबधब्यात प्रस्तरावारोहणात (रॅपलिंग) सहभागी होताना कुणी अत्तर (परफ्युम) वापरू नये, अशी सूचना दिली जाते. परंतु, काही उत्साही मंडळी नियमांचे पालन करीत नाहीत. मधमाश्यांचा हल्ल्यामागे तेही एक कारण असल्याचा अंदाज वर्तविला जातो.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bees attacked on tourists near shitkada waterfall0 harihar fort nashik the incident was caused by drones operated for observation asj