अहिल्यानगर: नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा ताण लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यावर, विशेषतः शिर्डी शनिशिंगणापूर या देवस्थान परिसरावर पडणार आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकार शिर्डी विमानतळ व नाशिक-शिर्डी जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरी व तीन पदरीकरण करणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी २३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.

या रस्त्यांच्या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होऊन कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली. सन २०२७ मध्ये कुंभमेळा नाशिकला होणार असला तरी लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही भाविकांची गर्दी लोटणार आहे. शिर्डी व शनिशिंगणापूर ही दोन्ही देवस्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत. या दोन्ही ठिकाणी भाविक आवर्जून भेट देणार हे लक्षात घेऊन राज्य सरकार व जिल्हा प्रशासन त्यादृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक- शिर्डी रस्ता व शिर्डी विमानतळाहून नाशिकला जोडणाऱ्या दोन रस्त्यांना २३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पिंपरी निर्मळ ते निमोण मार्गे नाशिक हा रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे. त्यासाठी १६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे २२ किमी. लांबीचा व १६.५ मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. रस्त्याच्या मधोमध दीड मीटरचा दुभाजक टाकण्यात येणार असून झाडेही लावण्यात येणार आहेत. या रस्त्यावर तीन ठिकाणी जंक्शन उभारण्यात येणार आहेत. काही ठिकाणी भव्य कमानीही आहेत. भविष्याचा विचार करून विजेचे खांब उभारण्यासाठी पाईपलाइन टाकण्यात येणार आहे.

याशिवाय कोल्हार-लोणी मार्गे जुना नाशिक रस्ता शिर्डी विमानतळाशी जोडण्यात येणार आहे. हा रस्ता तीन पदरी असेल १३.८ किमी. लांबीच्या या रस्त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. काकडी विमानतळ परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यासाठी तिहेरी परीक्षण केले जाणार आहे. स्थानिक बांधकाम विभाग, गुणवत्ता नियंत्रण मंडळ व त्रयस्थ यंत्रणेमार्फत या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. त्यात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले तर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही नाशिक विभागीय आयुक्तांकडून देण्यात आला आहे.

गुणवत्ता तपासणीसाठी मोबाइल लॅब

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये सुमारे २ हजार कोटी रुपयांची तर अहिल्यानगर जिल्ह्यात २३० कोटी रुपयांची कामे होणार आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी प्रथमच गुणवत्ता तपासणीसाठी मोबाइल लॅब उभारण्यात येणार आहे. जेथे आवश्यक आहे तेथेही मोबाइल लॅब जाऊन गुणवत्ता तपासणी करेल. या लॅबसाठी सुमारे ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.