आरोग्य विभागाचा उपक्रम
आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी ‘करू या तिचे स्वागत’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाशिकसह मालेगाव शहरात या उपक्रमास सुरुवात झाली.
‘बेटी बचाव-बेटी पढाव’ ही घोषणा शासनाने केली असली तरी ‘बेटी’ आपल्या घरी यावी हे किती लोकांना वाटते?, मुलीच्या जन्माकडे समाज कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो हे सर्वश्रृत आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी तिच्या जन्माचा उत्सव व्हावा, तिच्याशी संबंधित प्रत्येक नात्याने तिचे मनापासून स्वागत करावे यासाठी आरोग्य विभागाच्या ‘पीसीपीएनडीटी’ याचे आयोजन केले आहे.
अष्टमीच्या रात्री १२ वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. पहिला मान सातपूर येथील प्रिन्सी तिवारी यांच्या चिमुकलीला मिळाला. मुलीच्या आईला साडी देऊन ओटीही भरण्यात आली. चिमुकलीला नवे कपडे देत तिच्या जन्माचे स्वागत सनईच्या स्वरात करण्यात आले. प्रसूती कक्षाच्या बाहेर रांगोळीही काढण्यात आली होती. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातही हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गुंजाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, अधिसेविका मालिनी देशमुख आदी उपस्थित होते. मागील काही चुका लक्षात घेता हा उपक्रम नियमितपणे सुरू रहावा, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्य़ातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये या उपक्रमाची अमलबजावणी व्हावी यासाठी कक्ष प्रयत्नशील आहे.
केवळ तिच्यासाठी..
मुलीच्या जन्माचा दर वाढावा यासाठी ‘पीसीपीएनडी’ कक्ष प्रयत्नशील असून त्यासाठीच ‘तिच्या जन्माचा उत्सव’ करण्याचे ठरविले आहे. उपक्रम राबवितांना तिच्या कुटूंबातील अन्य सदस्यांनाही यात सामावून घेण्यात येत आहे. कुटूंबातील प्रत्येक सदस्यांचा मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठीच हे प्रबोधन सुरू आहे. – अॅड. सुवर्णा शेपाल, पीसीपीएनडीटी कक्ष प्रमुख, जिल्हा शासकीय रुग्णालय