नाशिक : राजकीय क्षेत्रात स्वाभिमानाने जे काही मिळेल ते घ्यायचे. स्वाभिमान सोडून काही मिळणार असेल तर बाहेर पडणे केव्हाही चांगले, असे मत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रविवारी वंजारी युवा सन्मान आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात मुंडे यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी अनेकांकडून विचारणा होणाऱ्या राजकारणात संधी का मिळत नाही, यावर उत्तर दिले. राजकारणात वावरताना आपण खूप संयम बाळगला.
हेही वाचा >>> वसंत मोरे यांची ‘राजनिष्ठा’, राज ठाकरेंच्या कार्यक्रमात तासभर उभे राहण्याची वेळ
संयमातून हवे ते मिळेल आणि आपली परिस्थिती बदलेल, यावर विश्वास आहे. राजकारणात आतापर्यंत खूप काही मिळवले आणि मिळवायचे आहे. आणि ते आपण मिळवणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारण आणि समाजात वावरताना बरीच कसरत करावी लागली. मात्र, तुम्ही जे बोलता तसेच वागत असाल तर पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. याचा अनुभव सध्या आपण घेत आहोत. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी आपण कुठल्याही क्षणी वाकणार नाही. वडिलांचा हा बाणा आजही आपल्यात कायम आहे. महाभारतातील भिष्म पितामह यांची भूमिका सध्या आपण वठवित आहोत, असेही त्यांनी नमूद केले.