बाली (इंडोनेशिया) येथे सुरू असलेल्या आशियाई यूथ ब्लिट्झ (अतिजलद) बुध्दिबळ स्पर्धेत जळगावची भाग्यश्री पाटील हिने विजेतेपद मिळविले.
या स्पर्धा ब्लिट्झ (अतिजलद) स्वीस लीग पद्धतीने घेण्यात आल्या. त्यात इंडियन ऑइलची भाग्यश्री पाटील हिने सात फेर्यांअखेर सहा विजय आणि एक पराभव, असे सहा गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. याअगोदरही रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम आणि क्लासिक स्पर्धेत पाचवा क्रमांक तिने मिळविला. असे भारताला दोन सुवर्णपदके मिळवून देण्याची कामगिरी केली.
भाग्यश्रीने गुयेन थी खंड व्हॅन (व्हिएतनाम), बल्बयेवा शेनिया (कझाकस्तान), रिंधिया व्ही. (भारत), वू बुई थी थान वान (व्हिएतनाम), वुओंग की अंह (व्हिएतनाम), कलिउविआन सिसिलिया नातलिए (इंडोनेशिया) यांना पराभूत केले. तर सुल्तानबेक झिनीप (कजाकिस्तान) हिच्याकडून भाग्यश्री पराभूत झाली. स्पर्धेत आठ देशांचा सहभाग होता. एकूण २१ स्पर्धक सहभागी झाले होते. एक ऑक्टोबर २०२२ पासून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने भाग्यश्री पाटीलला शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले असून, ती आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची खेळाडू झाली आहे, असे प्रवीण पाटील यांनी कळविले आहे.