दिग्गज कलाकारांचा सहभाग
येथील पवार तबला अकादमीच्यावतीने बुधवारी सायंकाळी सहा वाजता पं. भानुदास पवार स्मृती संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक कीर्तीचे तबलावादक पं. अनिंदो चटर्जी यांचे तबलावादन तसेच नाशिक येथील प्रा. अविराज तायडे यांचे गायन होणार आहे.
महाकवी कालिदास कला मंदिर येथे हा कार्यक्रम होईल. चटर्जी हे तबल्यातील फरुखाबाद घराण्याची परंपरा समर्थपणे चालवत आहेत.
लखनौ घराण्याच्या उस्ताद अफक हुसैन खाँ यांच्याकडे त्यांनी तबल्याचे धडे गिरविले.
यानंतर ३०व्या वर्षी पं. ज्ञानप्रकाश यांच्याकडे तबल्याची तालीम घेतली. या कार्यक्रमात पंडितजींबरोबर त्यांचे चिरंजीव व आजचे उभरते तबलावादक अनुब्रत चटर्जी सहवादन करणार आहेत.
फारख लतीफ सारंगीची तर प्रशांत महाबळ त्यांना संवादिनीची संगीतसाथ करतील.
मैफलीची सुरुवात पं. भीमसेन जोशी आणि सी. आर. व्यास यांचे शिष्य गायक अविराज तायडे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. त्यांना नितीन पवार हे तबल्यावर तसेच सुभाष दसककर संवादिनीवर संगीतसाथ करतील. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून रसिकांनी मैफलीस उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा