जळगाव – ईव्हीएम यंत्र हटवा, मतदान चिठ्ठ्यांचा वापर करा आणि लोकशाही वाचवा, या मागण्यांसाठी बुधवारी भारत मुक्ती मोर्चाच्या जिल्हा शाखेतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम यंत्रातील मतदानासोबतच व्हीव्हीपीएटीतील निघालेल्या चिठ्ठ्यांची शंभर टक्के मोजणी करावी यासह २० मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

भारत मुक्ती मोर्चाचे खान्देश प्रभारी नितीन गाढे व जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आल्याचे खान्देश प्रभारी गाढे यांनी सांगितले. लोकांचा आक्षेप ईव्हीएम यंत्रावर आहे. आजही ईव्हीएममधील मतांच्या आधारेच निकाल जाहीर होतो. ईव्हीएममधील मतांचा घोटाळा होऊ नये म्हणून व्हीव्हीपीएटी यंत्रे लावण्यात आली.

व्हीव्हीपीएटीमधील शंभर टक्के केंद्रातील शंभर टक्के मतांची मोजणी केल्यास ईव्हीएममधील केलेल्या मतांचा घोटाळा उघड होईल; परंतु, एक टक्काच मतमोजणी केली जाते. त्यामुळे घोटाळा उघड होऊ शकत नाही, असे जिल्हाध्यक्ष निकम यांनी सांगितले. आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सहसंयोजक सुमित्र अहिरे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे डॉ.शाकीर शेख, गनी शाह, अकील कासार, बहुजन मुक्ती पक्षाचे प्रमोद सौंदाणे- पाटील, अमजद रंगरेज, विजय सुरवाडे, गोर बंजारा क्रांती संघाचे खान्देश प्रभारी धनराज चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाचे जाकीर कुरेशी आदींचा सहभाग होता.

हेही वाचा : “३० ते ३५ टक्के मतदारसंघांतील ‘ईव्हीएम’चे हॅकिंग केले जाते”, संजय राऊतांचा गंभीर आरोप!

आंदोलनाला सामाजिक व राजकीय संघटनांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून समर्थन केले. मराठा सेवा संघाचे खुशाल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी मंगला पाटील, अशोक लालवंजारी, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, काँग्रेसचे विश्वास सपकाळे, अरुणा पाटील, मणियार बिरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख, एमआयएमचे ऐनोद्दीन शेख आदींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला.

Story img Loader