नाशिक : माजी विश्वस्तांचा आक्षेप तसेच पुरातत्व विभागाकडून पत्र देण्यात आलेले असतानाही महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान बुधवारी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नृत्याचा कार्यक्रम घेण्यावर ठाम आहे.
त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी देवस्थानच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिव तांडव ग्रुपतर्फे नृत्य, सायंकाळी आठ वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणनस्तु नृत्य अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी नटराज अकॅडमीचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. माजी विश्वस्त तथा सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.
पुरातत्व विभागाला याविषयी पत्र देत या कार्यक्रमामुळे काय होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. मंदिराच्या आवारात हा कार्यक्रम ठेवणे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणणारा आहे. या कार्यक्रमासाठी गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करुन देवस्थानने तारांकित व्यक्तींना बोलावून नवीन पायंडा पाडू नये, अशी भूमिका शिंदे यांनी घेतली. पुरातत्व विभागाकडूनही देवस्थानला पत्र पाठविण्यात आले. देवस्थानातर्फे सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले असून प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रम घेण्यात गैर काय ?
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी विनामोबदला नृत्यसेवा करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना संधी देण्यात आली आहे. त्या भरतनाट्यम सादर करणार असून कार्यक्रमात त्र्यंबकेश्वरमधील दोन नृत्य साधकही सहभागी होणार आहेत. पुरातत्व विभागाने पत्रात कार्यक्रम होऊ शकत नाही किंवा घेऊ नका, असे म्हटलेले नाही. कार्यक्रमामुळे गर्दी झाली, काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना असतील, जबाबदार कोण, असे प्रश्न विचारले आहेत. त्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले असल्याने कार्यक्रम होणार आहे. – मनोज थेटे (विश्वस्त, त्र्यंबक देवस्थान तथा पुरोहित संघ अध्यक्ष)