नाशिक : जातीनिहाय जनगणनेचा विषय राजकीय पटलावर चर्चेत असताना भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेश संस्थेच्यावतीने शहरातील इंदिरानगर, पाथर्डीफाटा, गोविंदनगर, बोधलेनगर, सराफबाजार भागात सुमारे १२०० घरांची खानेसुमारी करण्यात आली. या माध्यमातून साडेचार ते पाच हजार बांधवांची जनगणना झाली. संपूर्ण जिल्ह्यात समाजबांधवांची खानेसुमारी करण्याचा संस्थेचा मानस आहे. या माध्यमातून समाजाची ताकद कुठल्या भागात आहे, निवडणुकीत त्याचा कसा उपयोग होईल, शासकीय सवलतींचा लाभ मिळतो की नाही, यावर मंथन करता येणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

भारतीय सुवर्णकार समाज नागपूर आणि महाराष्ट्र प्रदेश संस्थेतर्फे शहरातील काही भागासह त्र्यंबकेश्वर येथे खानेसुमारीचे काम करण्यात आले. यातून समाजबांधवांची संकलित झालेली माहिती स्मरणिकेत समाविष्ट करण्यात आली. या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा २७ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नभांंगण लॉन्स येथे होणार आहे. याबाबतची माहिती सुवर्णकार समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष रमेश वडनेरे यांनी दिली. कार्यक्रमात जयवंतराव रणधीर (पुणे) आणि जगदीश देवपूरकर (धुळे) हे ‘समाजाची दशा व दिशा’ या विषयांवर मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय सरचिटणीस ओंकारेश्वर गुरव, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव करीले, महिला आयोगाच्या उपाध्यक्षा माया हाडे आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा…कांदा दर गडगडल्याने शेतकरी संतप्त

जातीय जनगणनेचा विषय राजकीय पटलावर गाजत आहे. सरकारतर्फे अशी गणना होईल की नाही, हे अस्पष्ट असताना सुवर्णकार समाज संस्थेने समाजबांधवांची माहिती परस्परांना कळावी म्हणून काही भागात १२०० घरांची खानेसुमारी केली. त्याअंतर्गत कुटूंब प्रमुखाचे नाव. घरातील सदस्य यांची नोंद घेतली गेली. प्रतिघर अंदाजे चार व्यक्ती याप्रकारे साडेचार ते पाच हजार जणांची गणना झाली. सर्वेक्षणात सराफ बाजार, इंदिरानगर, गोविंदनगर आणि पाथर्डी फाटा भागात सुवर्णकार समाजबांधवांची संख्या अधिक असल्याचे उघड झाले. दीड ते दोन वर्षांपूर्वी कॉलेजरोड, गंगापूररोड, महात्मानगर आणि सातपूर भागात ही प्रक्रिया राबवली गेली होती. तेव्हा उपरोक्त भागात सुमारे पाच हजार समाजबांधव असल्याचे निरीक्षण होते. सुवर्णकार समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष रमेश वडेनेरे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा…येवला तंबाखुमुक्त शाळांचा तालुका घोषित

अहिर सुवर्णकारांची संख्या अधिक

नुकत्याच झालेल्या खानेसुमारीत सुवर्णकार समाजातील अहिर, लाड, दैवज्ञ, पांचाळ आणि वैश्य आदी उपजातींची गणना करण्यात आली. इंदिरानगर, पाथर्डीफाटा, गोविंदनगर, बोधलेनगर, सराफ बाजार भागात अहिर सुवर्णकार समाजातील बांधवांची संख्या अधिक असल्याचे निष्पन्न झाले, असे वडनेरे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील १५० घरांच्या खानेसुमारीची माहिती स्मरणिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

Story img Loader