लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५५ हजार ७३७ सभासदांकडे २३६५ कोटींची थकबाकी आहे. यातील पाच हजार ६४४ सभासद हे १० लाखांवरील थकबाकीदार असून त्यांच्याकडे एकूण थकबाकीपैकी ४३ टक्के रक्कम थकीत आहे. कर्ज वसुलीसाठी बँकेने धडक मोहीम हाती घेतली असून १० लाखावरील थकबाकीदारांचे लवकरच गावोगावी फलक लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेचा परवाना अबाधित राखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित बँक बचाव मेळाव्यात सूचित करण्यात आले.
कधीकाळी राज्यात नावाजलेल्या आणि अलीकडेच वाढत्या अनुत्पादक मालमत्तेच्या (एनपीए) प्रमाणामुळे अडचणीत आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर थकीत कर्जाच्या वसुलीचे मोठे आव्हान आहे. थकीत कर्जाच्या वसुलीबाबत विचार विनिमय करण्यासाठी जिल्हा बँक बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेवंता लॉन्स येथे झालेल्या मेळाव्यात प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, राज्य सचिव संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ निकम, शिखर व संशोधन संस्थेचे बाळासाहेब देशमुख, सहकारतज्ज्ञ बाळासाहेब पतंगे आदींनी प्रभावी वसुली कशी करावी, वसुलीचे आधुनिक तंत्र कौशल्ये, बँकेसमोरील आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले.
आणखी वाचा-नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरोधात खंडणीचा गुन्हा
६८ वर्षाची परंपरा लाभलेली जिल्हा बँक वाढती थकबाकी, एनपीए व तोटा यामुळे अडचणीत आली आहे. बँकेचे विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने व इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या उभारणीत दिलेले योगदान कोणीही नाकारू शकणार नसल्याचे प्रशासक चव्हाण यांनी नमूद केले. २०१७-१८ पासून नोटबंदी, कर्जमाफी घोषणा, अवकाळी पाऊस व दुष्काळी परिस्थितीमुळे या बँकेचा शेती कर्ज पुरवठा अडचणीत आला. त्याचा परिणाम बँकेच्या नफा क्षमतेवर झाला. जिल्ह्याच्या भविष्यातील अर्थकारणासाठी बँकेला गतवैभव प्राप्त होणे अत्यंत आवश्यक असून थकबाकीदार सभासदांनी थकबाकीची रक्कम भरून त्यांचावरील थकबाकीचा शिक्का नष्ट करावा. अशी बँकेची भावना आहे. थकबाकीदाराकडे अडकलेला पैसा बँकेतील ठेवीदारांच्या ठेवींचा असून थकबाकीदाराकडून तो वसूल करून ठेवीदारांना ठेवी देण्याची जबाबदारी रिझर्व बँकेच्या कायद्यानुसार बँकेची आहे. त्यामुळे कर्ज परतफेड न झाल्याने कारवाईचे कर्तव्य बँकेला टाळता येत नाही. बँकेने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. बड्या थकबाकीदारांचे गावोगावी लवकरच फलक लावण्याचे ठरले असल्याचे प्रशासक चव्हाण यांनी सांगितले. कर्मचारी वर्गाने जूनपर्यत एकही सुट्टी न घेता बँकेसाठी एकच ध्यास घेऊन ठेववाढ, वसुली, बँकेच्या भागवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव यांनी सहकार चळवळीचे महत्व विषद करून सर्व सेवकांनी एकजुटीने काम केल्यास आपली जिल्हा बँक वाचणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ही शेतकऱ्याची बँक असून सेवकांनी शेतकरी सभासद व ठेवीदार सभासदांमध्ये बँकेविषयी विश्वास निर्माण करावा असे त्यांनी नमूद केले. सचिव संघटनेचे निकम यांनी आशिया खंडातील नावाजलेल्या बँकेसाठी आज बँक बचाव मेळावा घ्यावा लागतो, याबद्दल दु:ख व्यक्त केले. बँक बचाव मेळाव्यास संघटनेचे उपाध्यक्ष साहेबराव पवार, मिलिंद देवकुटे, गोपीचंद निकम, नंदकुमार तासकर, सुभाष गडाख, मिलिंद पगारे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.