नाशिक: थकीत कर्जामुळे आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ऐपतदार, मोठे बागायतदार आणि हेतुपुरस्सर कर्ज थकविणाऱ्या जिल्हास्तरीय १०० मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रसिध्द करीत थकीत कर्ज भरण्याचे आवाहन केले. त्यास आतापर्यंत केवळ नऊ जणांनी प्रतिसाद देऊन थकीत रकमेचा भरणा केला. बँकेमार्फत लवकरच तालुकानिहाय मोठ्या १०० थकबाकीदारांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून जिल्हा मध्यमवर्ती बँकेकडे पाहिले जाते. आर्थिक गरज असेल तेव्हां शेतकऱ्यांची नजर जिल्हा बँकेवरच असते. त्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्यांना मदत करणारी म्हणून जिल्हा बँक ओळखली जाते. परंतु, बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड वेळेत करण्यात येत नसल्याने बँक अडचणीत आली आहे. लहान शेतकरी भीतीने कर्जफेड करण्यात पुढाकार घेत असले तरी अनेक मोठे शेतकरी थकबाकी भरण्याकडे टाळाटाळ करीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

हेही वाचा >>> सुषमा अंधारेंच्या सभेपूर्वीच गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील स्वागतफलक गायब – ठाकरे गटातर्फे पोलिसांकडे तक्रार

जिल्हा बँकेची २०२२ – २३ वर्षाची कर्ज वसुली एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. २१५६ कोटींची रक्कम वसूल करावयाची असून त्यातील १४५२ कोटी जुनी थकबाकी आहे. थकीत कर्जामुळे ठेवीदार आणि बँकेच्या खातेदारांना रक्कम देण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली होण्यासाठी बँक प्रशासक अरूण कदम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील मोठ्या, प्रभावशाली आणि हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर कायदेशीर बाबींची पूर्तता करून वसुलीसाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने बँकेने सहकारी संस्था अधिनियमान्वये थकबाकीदार सभासदांचे १०१ ची प्रकरणे दाखल करणे, वसुलीबाबत कायदेशीर नोटीस देणे, तालुका निहाय मोठ्या १०० थकबाकीदारांच्या याद्या तयार करून कलम १०७ अन्वये जप्ती आदेशानुसार नोंदीची कारवाई, सबंधित थकबाकीदाराची मूल्यांकन प्रकरणे तयार करून स्थावर लिलाव प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

जिल्ह्यातील मोठ्या १०० थकबाकीदारांची यादी प्रसिध्द केल्यानंतर आता तालुकानिहाय मोठ्या १०० थकबाकीदारांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सर्व थकबाकीदारांनी कटू कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपल्या थकबाकीचा भरणा करावा. बँकेने सामोपचार योजनेत व्याज सवलत देऊ केली असून थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करावे.

-अरुण कदम (जिल्हा बँकेचे प्रशासक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big arrears short response to zilla bank overdue loan recovery ysh
Show comments