कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांच्या आठवणीतील रावत दाम्पत्य
नाशिक : संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या पत्नी आणि डिफेन्स वाईफ वेल्फेअर संघटनेच्या प्रमुख मधुलिका रावत यांना कुणाचाही निरोप गेला की, अवघ्या पाच मिनिटात त्यांचे उत्तर यायचे. हेलिकॉप्टर अपघाताचे वृत्त ऐकल्यावर पटकन त्यांना दूरध्वनी लावला. पण तो लागला नाही. तेव्हाच काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव झाली..
संरक्षण दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर बिपिन रावत यांच्यासमवेत काम करणाऱ्या आणि सध्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची धुरा सांभाळणाऱ्या लेफ्टनंट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी बुधवारी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती समजल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना हा प्रसंग सांगितला आणि बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासमवेतच्या आठवणींनाही उजाळा दिला.
जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि सैन्य दलातील अधिकारी, जवान यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले हे ऐकून काही काळ सुन्न झाल्याचे सांगून डॉ. कानिटकर म्हणाल्या, लष्करी सेवेत असताना ही सर्व मंडळी कामाच्या निमित्ताने दैनंदिन संपर्कात होती.
‘सीडीएस’ अर्थात संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून बिपिन रावत यांची नियुक्ती झाल्यानंतर मुख्यालयात आपण पहिल्यांदाच प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर (वैद्यकीय) म्हणून त्यांच्या समवेत काम केले. रावतसरांकडे कधीही गेले की, ते अतिशय सुस्पष्ट आणि नेमके मार्गदर्शन करायचे. ते खूप मेहनती होते. मुख्यालयात रात्री आठ/नऊ वाजेपर्यंत ते काम करत असायचे. त्यांच्यासमवेत काम केल्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. हेलिकॉप्टर अपघाताचे वृत्त समजले तेव्हा विश्वासच बसला नाही. जनरल रावत आणि आपले पती ‘एनडीए’पासून एकत्र होते.
रावत यांच्या अकस्मात निधनाने देशाचे आणि आम्हा उभयतांचेही वैयक्तिक नुकसानही झाले आहे. सैन्यदलात इतक्या सर्वोच्च पदावर पोहोचलेला, सैन्य दलाचे नेतृत्व करणारा रावत यांच्यासारखा अनुभवी अधिकारी मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. मधुलिका आणि मी आमच्या दोघींची नेहमीच विविध विषयांवर चर्चा व्हायची, असेही कुलगुरू डॉ. कानिटकर म्हणाल्या.