नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील स्थिती
थंडीची चाहूल लागली की नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्याचा परिसर परदेशी पक्ष्यांच्या चिवचिवाटाने भरून जातो. सध्या रात्री उशिराने जाणवणाऱ्या थंडीने परदेशी पाहुण्यांनी चाहूल दिली असून काही दिवसांपासून परदेशी पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. या पाहुण्यांचे आगमन होत असताना मराठवाडय़ासाठी नाशिकच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आलेले पक्षी इतरत्र नवीन जागा शोधण्याची आणि येणाऱ्या पक्ष्यांचे आगमन काहीसे लांबणीवर पडण्याची शक्यता पक्षीमित्रांनी व्यक्त केली आहे.
गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर साकारलेले नांदुरमध्यमेश्वर धरण परिसर महाराष्ट्राचे भरतपूर अर्थात पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नदीच्या प्रवाहात गाळ साचल्याने उंचवटे तयार झाले. जलाशयातील उथळ पाणी, विपुल जलचर, विविध पाणवनस्पती, किनाऱ्यावरील वृक्षराजी, सभोवतालच्या शेतीतील हिरवीगार पिके ही एकूणच स्थिती पक्ष्यांच्या अधिवासाचे ठिकाण बनण्यास कारक ठरली. परिसरात २४० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. जवळपास ४०० हून अधिक वनस्पतींची विविधता असणाऱ्या परिसरात पक्ष्यांसोबत कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटय़ा, विविध प्रकारचे साप, कासव आदी वनचर आहेत. जलाशयात २४ प्रकारचे मासे आहेत. या सर्व बाबींमुळे गारवा जसजसा जाणवू लागतो, तसतसे परदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे धरणकाठ परिसरात विसावतात. यंदा थंडीने दिवाळीआधीच चाहूल दिल्याने पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असली तरी गोदावरीच्या पात्रात वाढलेला प्रवाह त्यांच्यासाठी अडसर ठरला आहे. गेल्या काही दिवसांत करकोचा, चमचा, राखी बगळा, पानकाडी बगळा, वंचक, रात्र बगळा, जांभळी पाणकोंबडी, मार्श शेरीयर, उघडय़ा चोचीचा करकोचा, गडवाल, वेडा राघू, दयाळ, वनपिंगळा, चंडोल, हळब्या, गप्पीदास, मुनिया, सातभाई आणि टिटवी आदींनी धरण परिसरात मुक्काम ठोकला आहे. यामुळे परिसराचे सौंदर्य बहरत असताना पाण्याच्या प्रवाहाने त्यांचा हिरमोड झाला आहे. याच कालावधीत मराठवाडय़ासाठी गंगापूर व दारणा धरण समूहातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नांदुरमध्यमेश्वर बंधारा व गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने मुक्कामी आलेल्या आणि येऊ घातलेल्या पक्ष्यांवर विपरीत परिणाम होणार असल्याचे नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आनंद बोरा यांनी सांगितले. पाण्याचा प्रवाह संथ होणे गरजेचे आहे. तो संथ होईपर्यंत उर्वरित पक्ष्यांच्या मुक्कामास काहीसा वेळ लागेल तसेच जे पक्षी आले आहेत ते इतरत्र जातील, अशी भीती बोरा यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा