नाशिक- आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्कासह शेतीमालाला रास्तभाव, भूसंपादनास विरोध, गायरान हक्क आदी मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबारपासून मुंबईकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा सोमवारी शहरात धडकला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले होते. नंदुरबारपासून निघालेला मोर्चा नाशिकजवळ आला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी नागपूर येथे चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई सफल झाल्याचे मानण्यात येत असतानाही मोर्चा शहरात दाखल झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह नंदुरबार, धुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांशीही मोर्चेकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी आदिवासी आयुक्त, वन अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व चर्चा सकारात्मक झाल्याने मोर्चा स्थगित झाल्याचे सभेचे राज्य सचिव किशोर ढमाले यांनी सांगितले.
हेही वाचा – “मयत सलीम कुत्ताच्या नावाने सत्ताधाऱ्यांचे राजकारण”, ठाकरे गटाचा आरोप
हेही वाचा – नाशिकमध्ये डोळ्यांवर फवारा मारुन दागिने लंपास, महिलेचा प्रताप
दरम्यान चर्चेत दुष्काळसंदर्भात वनहक्क दावेदारांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीच्या अंमलबजावणीसाठी तपशील ठरवण्यात आला. प्रशासनाकडून वनहक्कांबाबत अपात्र ठरविल्यास जिल्हा पातळीवर निवड समिती या अपात्र दाव्यांची फेरतपासणी करणार आहे, शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ आदिवासींना मिळालेला नाही. त्याबाबत जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी बैठक घेत बँकांना या विषयी जाब विचारणार आहे. तसेच धुळे, नंदुरबार येथे उपद्रवी मेंढपाळांकडून आदिवासींना त्रास दिला जात असल्याने याबाबत गृह विभाग माहिती घेऊन कारवाई करणार आहे. सर्व मागण्यांविषयी नाशिक, धुळे, नंदुरबार येथे दोन, तीन आणि चार जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. याबाबत त्या त्या विभागाला आवश्यक सूचना करण्यात आल्या असल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला.