धुळे : शहरातील मोगलाई भागातील प्रार्थनास्थळाच्या विटंबनेच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी भाजपसह समस्त हिंदू संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार डाॅ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रदीप जाधव, ठाकरे गटाचे माजी आमदार शरद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे आदींसह जिल्ह्यातील समविचारी संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला.
हेही वाचा… अमळनेरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; संचारबंदी लागू
हेही वाचा… माधवी साळवे यांचा मार्गच वेगळा; राज्य परिवहन नाशिक विभागातील पहिल्या महिला बस चालक होण्याचा मान
आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली. विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ही मुख्य मागणी मोर्चेकऱ्यांची आहे. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर मूर्ती ठेवण्यात आली होती. आग्रा रोड, कराचीवाला खुंट, महापालिकेची जुनी इमारत, महापालिकेची नवी इमारत आणि तेथून साक्री रस्तामार्गे शिवतीर्थावर या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. मुख्य बाजारपेठ सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून पोलीस अधीक्षक संजय बारकुंड लक्ष ठेवून आहेत. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.