नाशिक – भाजपच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या गाव चलो अभियानांतर्गत मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्काम करून केंद्र सरकारच्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. जिल्ह्याचा विचार करता या अभियानासाठी ३०० गावांची निवड करण्यात आली आहे. ही बहुसंख्य गावे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा हा मतदारसंघ आहे. डॉ. पवार यांच्यासह पाच आमदार, शहर-ग्रामीणचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य ३०० गावांमध्ये मुक्काम करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अभियानाची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, सरचिटणीस सुनील केदार उपस्थित होते. भाजपने व्यापक जनसंपर्कासाठी चार ते ११ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान हाती घेतले आहे. त्या अंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असल्याचे फरांदे यांनी नमूद केले.

हेही वाचा – वाळूमाफियांचे वाहन जळगाव निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी अडवले, अन घडले भयंकर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाची संघटना बांधणी मजबूत करताना गावोगावी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विकासाचे ध्येय ठेवून भाजप काम करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागील १० वर्षांतील प्रभावी कार्य, मागील जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. मोदींची हमी काय, हे प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार आहेत.

पक्षाचे आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांच्याबरोबर सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक गटात प्रवास करतील. त्यांना सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल, असे आमदार फरांदे यांनी सांगितले. प्रत्येक गटात भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करेल. यावेळी बूथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करण्यात येणार आहेत. शहरी भागात वॉर्डनिहाय हे अभियान राबवले जाईल. या ठिकाणी मुक्काम करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रशांत जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शनिवारच्या नियोजित दौऱ्याची माहिती दिली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

या अभियानात ज्या ३०० गावांमध्ये पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी मुक्काम करणार आहेत, ती बहुसंख्य गावे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा समावेश नाही. शहरात मात्र वॉर्डनिहाय हे अभियान राबवले जाणार आहे. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अभियानातून सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचवत एकप्रकारे प्रचाराचा श्रीगणेशा केला जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील उर्वरित तीन मतदारसंघात भाजपचे आमदार नाहीत. जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न असला तरी अभियानातून या मतदारसंघातील ग्रामीण भाग बाजूला ठेवला गेल्याचे दिसत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp focus on dindori constituency in gaon chalo campaign ministers mlas officials stay in 300 villages ssb