लोकसत्ता वार्ताहर
धुळे: भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवाढव्य कार्यकारिणी जाहीर केली असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्य करणाऱ्या अधिकाधिक जणांना कार्यकारिणीत सामील करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सहा विभाग (सेल) आणि २३ आघाडी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आठ मंडळ अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली. या कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष बळकटीकरण अधिक सोयीचे होईल, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. नवनियुक्त आघाडी प्रमुखांना जिल्हाध्यक्ष अंपळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यकारिणीत जिल्हा प्रवक्ता व सरचिटणीसपदी शामसुंदर पाटील, महिला मोर्चा अध्यक्षपदी वैशाली शिरसाठ, युवा मोर्चा अध्यक्षपदी आकाश परदेशी, सरचिटणीसांमध्ये जितेंद्र चौटिया, ओमप्रकाश खंडेलवाल, भारती माळी, संदीप बैसाणे, यशवंत येवलेकर यांचा समावेश आहे. चिटणीसपदी नऊ जणांना तर, उपाध्यक्षपदी १० जणांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय विविध २३ आघाडी प्रमुख नियुक्त करण्यात आले.
हेही वाचा… नाशिकमध्ये मोटारीतून मिरवणूक मार्गाची पाहणी, मनपा आयुक्तांकडून अतिक्रमण हटविण्याची सूचना
मंडळ अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली. त्यात देवपूर पूर्व- सुबोध पाटील, देवपूर पश्चिम-अरुण पवार, साक्रीरोड-भिलेश खेडकर, आझादनगर-बबन चौधरी, जुने धुळे- अॅड. सचिन जाधव, पेठ विभाग- जितेंद्र धात्रक, अग्रवाल नगर मोहाडी- ईश्वर पाटील, मिलपरिसर- अमोल मासुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.