नाशिक: प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत समोर आलेल्या विविध बाबींची महसूल यंत्रणेकडून सत्यता पडताळणी केली जात आहे. महसूल विभागाच्या सचिव स्तरावर ही चौकशी सुरू आहे. खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप करणे चुकीचे असल्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक दौऱ्यावर आलेल्या विखे पाटील यांनी खेडकर प्रकरणावर भाष्य केले. खेडकर यांच्या दाखल्यांविषयीचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर झाला आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर सनदी अधिकाऱ्यांबाबत जे निकष आहेत, त्यानुसार सचिव स्तरावर ही चौकशी सुरू असल्याचे विखे यांनी सांगितले. खेडकर यांच्या वडिलांचे शासकीय सेवेत असताना निलंबन झाले होते की नाही याबद्दल माहिती नाही. कारण तो महसूल विभागांशी संबंधित मुद्दा नाही. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांवर विखे यांनी आक्षेप घेतला. तुमच्या नेमणुकीवर शंका, प्रश्न उपस्थित होत असताना जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने ते काही कारवाई करतील, म्हणून त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांची सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशी करीत असल्याचे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा : नाशिक : गोदाम फोडून कपडे चोरणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीत काही आक्षेपार्ह नाही. सद्भभावनेचे वातावरण तयार करण्यासाठी काही विषयात पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाणे गरजेचे असते. भुजबळ हे पवारांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील, असे विखे यांनी सांगितले. आदिवासी बांधवांच्या जमिनी हडपल्या जात असल्याच्या तक्रारींविषयी विभागीय आयुक्तांना वस्तूस्थिती तपासण्याची सूचना करण्यात आल्याचे ते म्हणाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader radhakrishna vikhe patil claims that truth verification of ias puja khedkar case by revenue department at secretary level css