त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना अल्टिमेटम दिला आहे. हिंदू महासभेने केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षे जुनी असल्याचा दावा केला. यानंतर आता तुषार भोसले यांनी संजय राऊतांकडे २४ तासात माफीची मागणी केली आहे. ते बुधवारी (१७ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
तुषार भोसले म्हणाले, “संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे हे आम्ही घसा ओरडून सांगतो आहे. आज त्यांनी सिद्ध केलं की, त्यांनी केवळ हिंदुत्व सोडलेलं नाही, तर हिंदू धर्मही सोडला आहे. त्र्यंबकेश्वरचे सर्व पुरोहित, विश्वस्त, मंदिर व्यवस्थापन सगळे अशी कोणतीही प्रथा परंपरा नसल्याचं सांगत आहेत.”
“राऊतांनी ही परंपरा १०० वर्षे जुनी आहे हे सिद्ध करावं”
“असं असूनही संजय राऊत ही १०० वर्षे जुनी परंपरा आहे असं म्हणत असतील, तर याचा अर्थ संजय राऊत हिंदूची ‘औलाद’ नाही. ते हिंदूची ‘औलाद’ असतील तर त्यांनी ही परंपरा १०० वर्षे जुनी आहे हे सिद्ध करावं,” असं आव्हान तुषार भोसलेंनी संजय राऊतांना दिलं.
हेही वाचा : “त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनावर दबाव आणून…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; भाजपावर टीकास्र!
“२४ तासात माफी मागा, अन्यथा उद्धव ठाकरे…”
“मी संजय राऊतांना आव्हान देतो की, २४ तासात माफी मागा, अन्यथा उद्धव ठाकरेंना याचे गंभीर परिणाम भोगायला तयार रहावं,” असंही तुषार भोसलेंनी नमूद केलं.